पुण्यात मिळालेला सकारात्मक प्रतिसाद व औरंगाबादमध्ये मिळालेले थंडे सहकार्य अशा संमिश्र अनुभवानंतर आता ‘झालाच पाहिजे’ हे सीमावासीयांच्या व्यथा मांडणारे नाटक पश्चिम महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याच्या अपेक्षेने सादर होत आहे. या नाटकाचे प्रयोग सांगली व सातारा या शहरांमध्ये होत आहेत. कर्नाटकातील सीमाप्रश्नाला ताकदीने साथ देणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राकडून या नाटकालाही तितकीच मोलाची साथ मिळेल, असा विश्वास नाटकाचे निर्माते अनंत पणशीकर व युवा नेते नीतेश राणे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.     
नाटय़संपदा निर्मित व महाराष्ट्र कलानिधी प्रकाशित ‘झालाच पाहिजे’ या नाटकात सीमावासीयांच्या कथा व व्यथा मांडल्या आहेत. या नाटकामध्ये गण, भजन याने नाटकाची सुरुवात होते. श्रीकृष्णाला सीमाप्रश्न सोडविण्याचे आवाहन गवळणींमध्ये केले आहे. बासरीऐवजी तुतारी हे मराठी माणसाचे वाद्य श्रीकृष्ण वाजवितो आणि मराठी माणसाला जागे करण्याचा प्रयत्न करतो. लोकनाटय़ाशी साधम्र्य साधणारा हा नाटय़प्रयोग आहे.     
या नाटकाचे वैशिष्टय़ म्हणजे सीमावासीयांच्या वेदना चित्रित करून त्याच्या क्लिपिंग नाटकात वापरल्या आहेत. त्यामुळे त्यांचे दु:ख हे प्रेक्षकांपर्यंत जाऊन पोहोचते. यामुळे नाटकातील वास्तव अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर होते. परिणामी, सीमावासीयांना पाठबळ देण्यासाठी प्रेक्षकही आपोआप प्रवृत्त होतात, असे पणशीकर म्हणाले.    
या नाटकाचे लेखन प्रदीप राणे व संतोष पवार यांनी केले आहे. संतोष पवार यांचेच दिग्दर्शन आहे. सविता मालपेकर, हेमंत ढोमे, मानसी सिंग, रमेश वाणी, अनिल रसाळ, संदेश उपश्याम यांच्या भूमिका आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पहिला प्रयोग आज कोल्हापूर येथे पार पडला. उद्या ९ जून रोजी सातारा येथे प्रयोग होणार आहे. १० जून रोजी दुपारी मिरज व रात्री सांगली येथे प्रयोग होणार आहेत.