सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची गेली साडेआठशे वर्षांपासूनची परंपरा लाभलेल्या यात्रेस येत्या १२ जानेवारी रोजी प्रारंभ होणार आहे. पाच दिवसांच्या या यात्रेत नंदीध्वजांची मिरवणूक, अक्षता सोहळा, होमप्रदीपन, शोभेचे दारूकाम आदी कार्यक्रम होणार आहेत. या यात्रेत महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक व आंध्र प्रदेशातून लाखो भाविक सोलापुरात दाखल होणार आहेत. यात्रेची संपूर्ण तयारी झाल्याची माहिती सिध्देश्वर देवस्थान यात्रा समितीचे सभापती रुद्रेश माळगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्रात ज्या प्रमुख यात्रा भरतात, त्यात सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेचा प्रामुख्याने समावेश आहे. श्री सिध्देश्वर महाराजांनी बाराव्या शतकात सोलापुरात वास्तव्य केले होते. त्यांनी सोलापूरनगरीला ‘भू-कैलास’ या नावाने प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती. शहराच्या पंचक्रोशीत त्यांनी ६८ लिंगांची प्रतिष्ठापना केली होती. एवढेच नव्हे, तर त्यांनी जनसामान्यांच्या सामूहिक श्रमदानातून तलावाची निर्मिती केली होती. या तलावाला तीर्थक्षेत्राची प्रतिष्ठा लाभली. महाराजांनी अध्यात्मावर कन्नड वचने रचून आपल्या अंत:करणातील भक्तिभावनेला  शब्दरूप दिले. या सिध्दपुरूषाचे स्मरण म्हणून दरवर्षी संक्रांतीच्या वेळी सिध्देश्वर यात्रा भरते.
या यात्रेच्या पाठीमागे आख्यायिका सांगितली जाते. ती अशी-सिध्देश्वर महाराज योगसाधनेत मग्न असत. ते जेव्हा साधनागृहातून बाहेर येत, तेव्हा त्यांना अंगणात शेणसडा घालून सुरेख रांगोळी रेखाटलेली दिसत असे. हे काम कोण करते, हे त्यांना कळेना. एके दिवशी ते नेहमीच्या वेळेआधी साधनागृहातून बाहेर पडले, तेव्हा एक सुंदर तरूणी शेणसडा घालून रांगोळी रेखत असलेली दिसली. तिनेही विस्मयचकित होऊन नमस्कार केला. सिध्देश्वर महाराजांनी तिची विचारपूस केली असता तिने आपण कुंभारकन्या असल्याचे सांगत सेवा घडावी म्हणून दररोज अंगणात सडा घालून रांगोळी काढत असल्याचे कथन केले. तिने सिध्देश्वर महाराजांबरोबर विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु सिध्देश्वर महाराजांनी आपण ‘लिंगांगी’ असल्याने विवाह करून शकत नसल्याचे स्पष्ट केले. परंतु त्या कुंभारकन्येचा आग्रह कायम होता. तेव्हा महाराजांनी तिच्या इच्छेला मान देत आपल्या योगदंडाबरोबर प्रतीकात्मक विवाह करण्यास सुचविले. त्याप्रमाणे त्या कुंभारकन्येचा योगदंडाशी विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याचे स्मरण म्हणून दरवर्षी सिध्देश्वर यात्रा भरविली जाते. या यात्रेत विवाह सोहळ्यातील सर्व विधी पार पाडले जातात. यात पहिल्या दिवशी हरिद्रालेपन तथा यण्णिमज्जन (तैलाभिषेक) होतो. दुसऱ्या दिवशी अक्षता सोहळा संपन्न होतो. तर तिसऱ्या दिवशी होमप्रदीपन होऊन त्यात प्रतीकात्मक कुंभारकन्या होमकुंडात सती जाते.
यात्रेच्या परंपरेनुसार यंदा १२ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता यण्णिमज्जन विधीसाठी उत्तर कसब्यातील मल्लिाकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू मठापासून सिध्देश्वर महाराजांच्या नंदीध्वजांच्या मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. शहराच्या पंचक्रोशीत ६८ लिंगांना तैलाभिषेक करून ही मिरवणूक रात्री पुन्हा हिरेहब्बू मठात येऊन विसावते. १३ जानेवारी रोजी सिध्देश्वर मंदिराजवळील संमती कट्टय़ावर अक्षता सोहळा संपन्न होणार आहे. तत्पूर्वी नंदीध्वज मिरवणुकीने त्याठिकाणी दाखल होणार आहेत. तिसऱ्या दिवशी, १४ जानेवारी रोजी रात्री होम मैदानावर होमप्रदीपन सोहळा संपन्न होणार असून यात प्रतीकात्मक कुंभारकन्या सती जाते. १५ जानेवारी रोजीरात्री आठ वाजता होम मैदानावर शोभेचे दारूकाम होणार असून यात राज्यातील नामवंत कलाकार सहभागी होऊन शोभेची दारूकला सादर करणार आहेत. १६ जानेवारी रोजी नंदीध्वजांच्या वस्त्रविसर्जनाने यात्रेची सांगता होणार असल्याचे रुद्रेश माळगे यांनी सांगतले.
यात्रेनिमित्त सिध्देश्वर मंदिराजवळील होम मैदानासह पंचकट्टा परिसरात विविध खेळणी, करमणूक, ज्ञान-विज्ञान, गृहोपयोगी वस्तू विक्री, खाद्यपदाथार्ंची मिळून  २०९ दालने खुली राहणार आहेत. यात मौत का कुँवा, लोखंडी ब्रेक डान्स, गाढवाची कसरत, आकाश पाळणे, जादूचे प्रयोग, मिनी रेल, मेरी-गो-राऊंड, हंसी घर, डॉग शो, टोराटोरा, डिस्ने लॅन्ड आदींचे आकर्षण राहणार आहे.याशिवाय यंदा ऐतिहासिक ताज महालाची भव्य प्रतिकृती पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. याशिवाय लोकनाटय़ तमाशाचीही परंपरा पूर्ववत कायम राहणार आहे. या दालनांच्या माध्यमातून गतवर्षी मंदिर समितीला ३२ लाखांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा जनावरांचा बाजार रेवण सिध्देश्वर परिसरात भरणार असून यात सुमारे बारा हजार जनावरे विक्रीसाठी येण्याची अपेक्षा आहे. या बाजारात विविध सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यात्रेत सुरक्षा उपाय केले जात असून यात पोलीस यंत्रणेचे सहकार्य अपेक्षित असल्याचे माळगे यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेस देवस्थान समितीचे मालमत्ता सचिव गुंडप्पा कारभारी, विश्वस्त नंदकुमार मुस्तारे, सुदेश देशमुख, अ‍ॅड. आर. एस. तथा बाबूशा पाटील आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur village deity siddheshwar pilgrimage started from 12 jan
First published on: 07-01-2013 at 08:17 IST