सोलापूरजवळ फताटेवाडी येथे एनटीपीसीच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या सोलापूर सुपर औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाला गती आली असून येत्या चार वर्षांत हा प्रकल्प प्रत्यक्षात सुरू होणार असल्याची माहिती, या प्रकल्पाचे सरव्यवस्थापक प्रदीप बेहरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. अद्ययावत यंत्रसामग्रीचा वापर होणार असल्याने या वीज प्रकल्पामुळे सोलापूरच्या तापमानात वाढ होणार नसल्याचा निर्वाळाही त्यांनी स्पष्ट शब्दात दिला.
सोलापूरपासून १८ किलोमीटर अंतरावर दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी-आहेरवाडी परिसरात प्रत्येकी ६६० प्रमाणे एकूण १३२० मेगावॉट वीजनिर्मिती क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. २०१६ साली या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुढील सहा महिन्यात दुसरा टप्पा कार्यान्वित होणार आहे. ९३९५ कोटी खर्चाच्या या प्रकल्पासाठी १८५२ एकर जमीन यापूर्वीच संपादित झाली असून या ठिकाणी प्रकल्पाच्या उभारणीचे काम जोमाने सुरू आहे.
या प्रकल्पातून तयार होणाऱ्या विजेचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला होणार असल्याचे सांगताना प्रदीप बेहरे म्हणाले,की महाराष्ट्राला सर्वाधिक ६५६ मेगॅवॉट वीज सोलापूर सुपर थर्मल वीज प्रकल्पातून वितरित होणार आहे. याशिवाय मध्य प्रदेश-३०४, छत्तीसगढ-१२२, गोवा-२२, दमण व दिव-७, दादर-नगर-हवेली-११ याप्रमाणे विविध राज्यांना वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला होणार असल्यामुळे साहजिकच सोलापूरच्या विकासाला चालना मिळू शकेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या प्रकल्पासाठी २२ हजार ८०० मे.टन कोळसा लागणार असून हा कोळसा ओरिसाच्या महानदी कोल फिल्ड प्रा.लि. कंपनीकडून उपलब्ध होणार आहे. तर पाण्याची उपलब्धता उजनी धरणातून होणार आहे. त्यासाठी ५२.६ दशलक्ष घनमीटर पाणी लागणार आहे. हे पाणी पुनर्प्रक्रिया करून पुन:पुन्हा वापरले जाणार आहे. उजनी धरणातून या प्रकल्पासाठी दोन टीएमसी पाणी राखीव आहे. प्रकल्पाशिवाय सोलापूर शहर व प्रकल्पाच्या परिसरातील गावांसाठी पाईपलाईन योजनेद्वारे पाणीपुरवठा योजना राबविण्याची सामाजिक जबाबदारीही एनटीपीसीने हाती घेतली आहे. त्यासाठी २५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या पाणी योजनेमुळे सोलापूरसाठी आता दुसरी पाईपलाईन पाणी योजना उपलब्ध होणार असल्यामुळे स्थानिक पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे बेहरे यानी नमूद केले.
सोलापूरचे तापमान मुळातच अन्य जिल्ह्य़ाच्या तुलनेने जादा आहे. त्यात आता एनटीपीसीच्या या वीज प्रकल्पामुळे  तापमानात आणखी भर पडणार असल्याची भीती नागरिकांतून व्यक्त होत आहे. त्याबद्दल विचारले असता बेहरे यांनी याप्रकल्पामुळे तापमानवाढ  केवळ असंभव असल्याचा निर्वाळा दिला. चंद्रपूर, परळी या भागात वीज प्रकल्पामुळे तापमानात वाढ झाल्याचे सांगितले जाते. परंतु त्याठिकाणच्या वीज प्रकल्पातील यंत्रसामग्री जुनी आहे. तर सोलापूरच्या या औष्णिक वीज प्रकल्पासाठी आयात केली जाणारी यंत्रसामुग्री अद्ययावत आहे. कोळशातून तयार होणारी राख इतरत्र न पसरू देता ती बंदिस्त केली जाणार आहे. प्रकल्पातील बॉयलरची चिमणी तब्बल २७५ मीटर उंच राहणार आहे. ही राख रेल्वेने निर्यातही केली जाणार आहे. वीजनिर्मितीसाठी बॉयलरमध्ये कोळसा जाळून वाफ तयार केल्यानंतर जळालेला कोळसा राखेच्या रूपाने बाहेर काढला जातो. राखेमुळे धुळीचे कण वाढणार नाहीत किंवा वाफेच्या गळतीमुळे तापमान वाढू नये म्हणून गळती होणार नाही, याची दक्षता अद्ययावत यंत्रसामग्रीच्या माध्यमातून घेतली जाते. एखाद्या क्षणी गळती सुरू झाल्यास त्यावर लगेचच नियंत्रण ठेवता येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. शिवाय प्रकल्प परिसरात एक लाख २६ हजार वृक्षांची लागवड केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी प्रकल्पातील तांत्रिक विभागाचे अपर सरव्यवस्थापक वाय. पी. सिंह, मनुष्यबळ विकास विभागाचे अपर सरव्यवस्थापक एम. पाटील, आर. डी. जयवंत, अजय सक्सेना, जी. के. पराशर, मोहम्मद उस्मान खान, जी. शेखर, आर. पी. पटेल आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

More Stories onवेग
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Speed to thermal power project raising in solapur
First published on: 18-03-2013 at 01:06 IST