स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने सुरू झालेल्या स्वच्छता मोहिमांमुळे अभिनेते, उच्चपदस्थ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्यामध्ये स्वच्छतेविषयी कमालीची जागृती निर्माण झाली आहे. शहरात, गल्लीत, चौकांमध्ये छोटय़ा-छोटय़ा स्वच्छता मोहिमांचे आयोजन होऊ लागले असून या मोहिमांमुळे कचरा साठण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. अशी अश्वासक परिस्थिती असली तरी शहरात कुठेही बिनधास्त थुंकणाऱ्यांच्या संख्येत मात्र अद्याप घट होऊ शकलेली नाही. शहरातील सार्वजनिक ठिकाणच्या भिंतींवर अजूनही थुंकीची रांगोळी कायम असल्याचे चित्र आहे. विषेशत: रेल्वेस्थानक परिसर, स्कायवॉक, पदपथांवर थुंकणारे लोक बिनदिक्कत पिचकारी मारत आहेत. थुंकीबहाद्दरांच्या या थुंकदाणीमुळे स्वच्छता अभियानाच्या मुख्य उद्देशावरच बोळा फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे, हरित ठाणे, तर सुंदर कल्याण स्वच्छ कल्याण अशा आशयाच्या घोषणांनी गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्वच्छतेविषयी जनजागृती केली जात असतानाही या मोहिमांना पुरेसे यश मिळालेले दिसत नाही. अस्वच्छतेच्या गर्तेत अडकलेल्या या शहरांना स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून स्वच्छ शहरे बनण्याची एक संधी निर्माण झाली. या मोहिमे अंतर्गत सामान्य नागरिकांनी स्वच्छतेसाठी काम करण्याचा निर्माण घेऊन स्वच्छतेविषयीची जागरूकता दाखवून दिली. मात्र अशा स्वच्छतेस अनुकूल परिस्थितीचा थुंकणाऱ्या थुंकीबहाद्दरांवर मात्र कोणत्याही प्रकारचा परिणाम झालेला नसून मिळेल त्या ठिकाणी थुंकण्याकडे त्यांचा कल कायम आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसिरातील नवीन तिकीट खिडकी, नवा सॅटीस स्कायवॉक, नवे रेल्वे पूल, फलाट, स्वच्छतागृह थुंकणाऱ्यांसाठी हक्काची जागा बनली आहे. स्वच्छता कर्मचारी हे साफ करण्याचा प्रयत्न करत असले तरी शेकडोंच्या संख्येने असलेल्या या थुंकीबहाद्दरांपुढे त्यांच्या कामाला मर्यादा पडते आणि काही तासांतच ठिकाठिकाणच्या भिंतींवर थुंकीची रांगोळी उमटते. मावा, गुटखा, पानमसाले खाणाऱ्या या थुंकीबहाद्दरांचा त्रास लोकलमधील डब्यातही कायम आहे. शिवाय चालत्या लोकलमधून मारलेल्या पिचकाऱ्यांमुळे सहप्रवाशांवर रंगपंचमी करून हे बहाद्दर स्वच्छता मोहिमांना गालबोट लावत आहेत.
कल्याण शहरातील स्कायवॉकवरील परिस्थिती अधिक गंभीर असून या भागात नव्या कोऱ्या स्कायवॉकची थुंकीबहाद्दरांनी थुकदाणी करून टाकली आहे. पिवळ्या रंगाच्या स्कायवॉकच्या भिंतींवर थुंकीच्या रांगोळीमुळे या भागातून चालण्यासही प्रवाशांना किळसवाणे वाटू लागले आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने रेल्वे पुलांवर जागोजागी थुकदाणी आणि कचरा कुंडय़ा ठेवलेल्या असून त्या कुंडय़ांमध्ये नव्हे तर कुंडय़ांच्या वरच थुंकणाऱ्यांचेच प्रमाण सर्वाधिक आहे. कल्याणच्या इको ड्राइव्ह यंगस्टर्स या संस्थेच्या वतीने कल्याणमध्ये स्वच्छता मोहिमेची आखणी केली असून यामध्ये थुंकीबहाद्दरांमध्ये जागृती करण्याचा या तरुणांचा सर्वाधिक प्रयत्न राहणार आहे. या संस्थेच्या तरुणांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये सरकारी कार्यालयाच्या भिंतींवर थुंकणाऱ्यांचे प्रमाण काही अंशी कमी झाले असले तरी कार्यालयाच्या खिडकीतून बाहेर थुंकणाऱ्यांचे प्रमाण मात्र वाढले असल्याचे दिसून येत आहे.
थुंकणाऱ्यांना रोखण्याचासाठी व्यापक प्रयत्न करणार..  
पंतप्रधानांनी हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छ भारत योजना सुरू केली असल्याने आम्हीही त्यांच्या उपक्रमास बळ देत आहोत. अस्वच्छता करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे थुंकीबहाद्दरांचे असून त्यांना रोखण्याासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. सुरुवातीला जनजागृतीच्या माध्यमातून आम्ही त्यांना थुंकण्याचे दुष्परिणाम कथन करणार आहोत. थुंकणाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यापासून परावृत्त करण्याचा व्यापक प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती कल्याणच्या इको ड्राइव्ह यंगस्टर संस्थेचे महेश बनकर यांनी दिली.