विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुटी म्हणजे वेगवेगळ्या शिबीरांची रेलचेल हे दरवर्षीचे समीकरण ठरलेले. दहा किंवा पंधरा दिवसांच्या शिबीरांमधून विद्यार्थ्यांमध्ये कितपत बदल होणार आहे..या शिबीराचा त्याला काही फायदा होणार आहे काय..शिबीरामध्ये खरोखर सुविधा उपलब्ध आहेत काय..मार्गदर्शकांची पात्रता काय..या कोणत्याच प्रश्नांच्या खोलात न शिरता बहुतेक पालक आपल्या पाल्यांना कुठल्यातरी शिबीरात भरती करून मोकळे होतात. एखाद्या शिबीराचा अपवाद वगळता बहुतेक शिबीर आयोजकांची भूमिका ही वेळ मारून नेण्याची असल्याने त्याव्दारे विद्यार्थ्यांच्या पदरी तर काही पडत नाही. परंतु पालकांचा खिसा मात्र हलका होतो.
अभ्यासाच्या त्रासातून परीक्षा संपल्यानंतर सुटका झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांना होतो न होतो तोच पालक त्यांच्यासमोर शिबीराचे संकट उभे करतात. सुटीमध्ये पाल्यांना कुठेतरी अडकविण्यासाठी शिबीर हा एक पर्याय पालकांसमोर असतो. आजकाल शिबीरांचे इतके पर्याय उपलब्ध आहेत की पाल्याच्या आवडीनुसार शिबीर उपलब्ध असतेच. या शिबीरांचे शुल्क एकदम तगडे असते. सर्वसामान्य पालकांना हे शुल्क परवडतच नाही. सर्व खेळांपासून तर अभिनय, साहस, कला, व्यक्तिमत्व विकास, विज्ञानविषयक अशा सर्वच विषयांचा या शिबीरांमध्ये समावेश असतो. काही महिनाभर चालणाऱ्या निवासी शिबीरांमध्ये तर खेळापासून व्यक्तिमत्व विकासापर्यंत सर्वकाही समाविष्ट असे ‘पॅकेज’ उपलब्ध असते. पालकही आपल्या पाल्यास स्वावलंबनाची शिकवण मिळावी म्हणून अशा शिबीरांमध्ये पाल्यास समाविष्ट करतात. नाशिकपासून जवळच असलेल्या एका संस्थेतर्फे आपल्या शाळेत प्रत्येक उन्हाळ्याच्या सुटीत अशा प्रकारच्या निवासी शिबीराचे आयोजन करण्यात येते. घोडस्वारीपासून कराटे, जलतरणपर्यंत सर्व काही या शिबीरात शिकविले जात असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात येतो. सात हजार रूपयांपुढे या शिबीराचे शुल्क असते. शुल्काची कोणतीही पर्वा न करता पालकांकडून मोठय़ा प्रमाणावर या शिबीरात पाल्यास दाखल केले जाते. या शिबीराचा अलिकडेच समारोप झाला. बॅडमिंटन, टेनिस, क्रिकेट, जिम्नॅस्टिक शिकविणारेही शिबीर या कालावधीत सुरू असतात. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना, नाशिक जिमखाना तसेच नाशिक क्रिकेट अकॅडमी यांच्या वतीने क्रिकेट शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. महिनाभराच्या शिबीरातून कोणीही क्रिकेटपटू घडू शकत नाही. केवळ एक विरंगुळा म्हणूनच या शिबीराकडे पाहिले जावे असा दावा खुद्द या शिबीर आयोजकांपैकी एकाचा आहे. खरे तर अशा शिबीरांमध्ये दाखल होणाऱ्या लहान मुलांमध्ये एका क्रिकेटपटूचा शोध घेणे आयोजक किंवा प्रशिक्षकांना सहजशक्य आहे. कारण एखादा लहानगा सर्वामध्ये वेगळी कामगिरी करत असल्यास त्याच्यावर परिश्रम घेऊन शिबीर संपल्यानंतरही तो या खेळाशी कायमचा कसा संपर्कात राहील, याविषयी त्याच्या पालकांशी चर्चा करणे प्रशिक्षकांना शक्य आहे. परंतु तितके कष्ट आजकाल प्रशिक्षकही घेत नसल्याचे कोणत्याही क्रिकेट प्रशिक्षण शिबीरास भेट दिल्यास लक्षात येईल.
अभिनय प्रशिक्षण वर्गही सुटय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणावर घेतले जातात. विविध खासगी वाहिन्यांवरील नृत्य तसेच अभिनयाचे शोज् पाहून आपल्या पाल्यानेही कुठेतरी अशी चमक दाखविण्याची आशा बाळगून पालक त्यांचे नाव शिबीरासाठी दाखल करतात. दिवसातून केवळ तीन-चार तास सुरू राहणाऱ्या अशा वर्गाचा विद्यार्थ्यांना फारसा उपयोग होत नाही हे पालकांनाही मान्य आहे. परंतु आपल्या पाल्यात बोलण्यात थोडाफार जरी धीटपणा आला तरी चालेल म्हणूनच ते या शिबीरात पाल्यास टाकतात. अलिकडे नाशिक येथील विज्ञान प्रबोधिनीतर्फे विद्यार्थ्यांसाठी एक शिबीर झाले. इतर शिबीरांपेक्षा काहीसे वेगळे आणि विद्यार्थ्यांच्या मनात शंका उपस्थित होण्यास भरपूर वाव देणारे हे शिबीर खरोखरच उपयुक्त असे म्हणावे लागेल. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे प्रदर्शनही या शिबीरात करण्यात आले.
शिबीराचे आयोजन करण्यामागे आयोजकांचा हेतू काय तसेच प्रशिक्षकांचा दर्जा काय याची तपासणी पालकांनी करणे आवश्यक झाले आहे. शिबीर आयोजक किंवा प्रशिक्षकांशी चर्चा केल्यास त्या माध्यमातून त्यांच्या हेतूविषयी पालकांना बरीच काही माहिती कळू शकते. उन्हाळ्याची सुटी अजून महिनाभर तरी बाकी असल्याने शिबीरांच्या संख्येतही वाढ होणार आहे. त्यामुळे आपल्या पाल्यास एखाद्या शिबीरात दाखल करण्याआधी पालकांनी सर्वेतोपरी चौकशी करणे आवश्यक आहे.