गेल्या अनेक वर्षांपासून दिले न गेलेले रिक्षा परवाने अखेर शासनाने खुले केले असले तरी त्यात नवीन परवाना मिळविण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असण्याची अट घालण्यात आल्यामुळे नवीन रिक्षा परवान्यांसाठीच्या अर्जाना अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शासनाने दहावी उत्तीर्णची अट शिथिल करून ती आठवी अनुत्तीर्णपर्यंत आणली आहे.
राज्यात १९९७ नंतर रिक्षा परवाने दिले गेले नव्हते. वाढत्या बेरोजगारीचा विचार करता नवीन रिक्षा परवाने द्यावेत म्हणून अनेक वर्षांपासूनची मागणी होती. अखेर शासनाने रिक्षा परवाने मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली. परंतु यात किमान दहावी परीक्षा उत्तीर्णची अट घातली गेल्यामुळे अनेक बेरोजगार इच्छूक तरूणांची अडचण झाली. त्यामुळे नवीन रिक्षा परवान्यासाठीच्या अर्ज भरण्यास कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.
येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरून पाठविण्याची अंतिम मुदत आहे. परंतु राज्यात खुल्या झालेल्या ६९ हजार ३०९ रिक्षा परवान्यांसाठी आतापर्यंत केवळ ८६ हजार एवढेच अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जाची संख्या अत्यल्प असून यात शिक्षणाची अट ठरल्याचे दिसून आल्यामुळे अखेर किमान दहावी परीक्षा उत्तीर्णची अट शिथिल करून ती आठवी अनुत्तीर्णवर आणली गेली आहे. सोलापुरात ८ हजार ५९३ रिक्षा परवाने असून त्यापैकी २ हजार ५२८ परवाने मृत आहेत.