आयआरबी कंपनीच्या टोल आकारणी विरोधातील आंदोलन पोलीस दडपशाहीने मोडून काढत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी आयोजित केलेल्या कोल्हापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यवहार बंद असल्याने शहरात शुकशुकाट होता. पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ दुचाकी रॅली काढण्यात आली. तर उद्या सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन व घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.    
शहरातील टोल आकारणी विरोधात आंदोलन करणाऱ्या टोलविरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना तसेच लोकप्रतिनिधींना शनिवारी रात्री पोलिसांनी लाठीमार करून संत्रस्त केले होते. शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी बदडून काढले होते. बंदूकशाहीच्या जोरावर आंदोलन मोडून काढण्याचा हा पोलिसांचा प्रयत्न होता, असा आरोप टोलविरोधी कृती समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत करण्यात आला. पोलीस व प्रशासनाच्या दडपशाहीच्या विरोधात सोमवारी कोल्हापूर बंदचे आयोजन करण्यात आले होते. या बंदला करवीरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सकाळपासूनच शहरातील सर्व व्यवहार बंद होते. व्यापारी पेठातील दुकाने बंद राहिल्याने रस्ते ओसाड पडले होते. सकाळी केएमटीची परिवहन सेवा बंद होती. यामुळे नागरिकांना पायपीट करावी लागली. तर, त्याची कल्पना नसलेले नागरिक व पर्यटक बसथांब्यांवर बराचकाळ उभे होते. रेल्वे स्थानकावर सकाळी रिक्षा सुरू राहिल्याने जमावाने दगडफेक केली. त्यामध्ये बऱ्याच रिक्षांच्या काचांचा चक्काचूर झाला. हा प्रकार वगळता बंद शांततेत पार पडला. शनिवारी रात्री कार्यकर्त्यांनी घेतलेला पवित्रा लक्षात घेऊन शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सकाळी १० वाजता बिंदू चौकातून टोलविरोधी कृती समितीचे कार्यकर्ते व नागरिकांनी दुचाकी रॅली काढली. आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांच्यासह कार्यकर्ते, महिलाही यामध्ये सहभागी झाल्या होत्या. देणार नाही, देणार नाही, टोल देणार नाही अशा घोषणा दिल्या जात होत्या. पोलीस प्रशासनाच्या लाठीमाराचा या वेळी निषेध नोंदविण्यात आला. तर, आंदोलनाचे पुढचे पाऊल म्हणून उद्या मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन व घंटानाद करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
 पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी
टोल विरोधातील आंदोलन १८ महिने शांततेने सुरू आहे. मात्र शनिवारी रात्री पोलीस प्रशासनाने हिटलरी वृत्तीचा धाक दाखवित कार्यकर्त्यांवर जबरदस्त लाठीमार केला. वीजपुरवठा बंद करून पोलीस निरीक्षक संजय कुरूंदकर व शाहूवाडीचे पोलीस उपनिरीक्षक माने यांनी जनतेला झोडपून काढण्याचे अशोभनीय कृत्य केले. याबद्दल या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत केली. या पोलीस अधिकाऱ्यांच्याविरूध्द विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.