आठवडय़ाचा पगार थेट बँक खात्यात जमा होणे, स्वत:चे डेबिट कार्ड वापरून एटीएम मशीनमधून पैसे काढणे, प्रीपेड कार्ड वापरणे, पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वर्ग करणे असे आर्थिक व्यवहार आता बांधकाम मजूर सहजपणे करणार आहेत.
‘कुशल’ संस्था, ‘क्रेडाइ’ आणि ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’तर्फे सोमवारी दीड हजार बांधकाम मजुरांची खाती उघडण्यात आली. तसेच या मजुरांना पासबुक आणि डेबिट कार्डाचेही वाटप करण्यात आले. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एम. व्ही. टांकसाळे, विभागीय व्यवस्थापक बी. एस. शेखावत, क्रेडाईचे उपाध्यक्ष राहुल गेरा, कुशलचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ या वेळी उपस्थित होते. टांकसाळे म्हणाले, ‘‘ पुण्यात तब्बल अडीच लाख स्थलांतरित कामगार आहेत. बांधकाम मजुरांचे राहण्याचे ठिकाण एक नसल्याने त्यांचे बँकेत खाते उघडणे जिकिरीचे काम समजले जाते. या उपक्रमाद्वारे त्यांना बँकेचे रोजचे व्यवहार करणे शक्य होईल. ‘कुशल’ने या मजुरांना बँकिंग व्यवहारांचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी घेतली आहे. नजिकच्या काळात आणखी सहा हजार पाचशे कामगारांची खाती उघडण्यात येणार आहेत.  क्रेडाईची विश्वासार्हता लक्षात घेऊन बँकेने या उपक्रमात भाग घेतला आहे.’’