उन्हाळ्याला सुरुवात झाली असून नेत्ररोगाने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या रुग्णालयात वाढू लागली आहे.शंभरपैकी २० जणांना डोळ्यांच्या रोगाची लागण होत असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्र विभागाचे प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी दिली.
उन्हाळ्यात डोळ्यांची अ‍ॅलर्जी होण्याचे प्रमाण सर्वात जास्त असून डोळ्यांना जीवाणू आणि विषाणूंचा जंतूसंसर्ग होऊन डोळे खराब होतात आणि डोळ्यांना खाज सुटते. डोळ्यात कचरा गेल्यासारखे वाटून डोळ्यातून पाणी येते, जळजळ वाढते अशा स्वरूपातील त्रास वाढत जातो. असा त्रास सुरू झाल्यास डोळे चोळू नये. तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे नेत्रतज्ज्ञ डॉ. अशोक मदान यांनी म्हटले आहे.
उन्हाळ्यात डोळ्यांचे रोग वाढत जातात. त्यासाठी काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. याकरिता उन्हात जास्त फिरणे टाळावे, काळा गॉगल वापरावा. मात्र, तो सूर्यापासून निघणाऱ्या अल्ट्राव्हॉयलेट किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करणारा असावा. डोळ्याची जळजळ काळ्या रंगाचा गॉगल वापरूनही सुरूच असते. त्यासाठी चांगल्या प्रकारचा गॉगल खरेदी करावा.
डोळे स्वच्छ पाण्याने नियमित धुवावे, भरपूर पाणी प्यावे, सतत एक तास टिव्ही पाहून नये आणि मुलांनाही टिव्ही पाहण्यापासून दूर ठेवावे, डोळ्यांची उघडझाप संगणकावर काम करत असताना करावी, हिरव्या पालेभाज्या खाव्या, काकडीचे काप डोळ्यावर ठेवावे, दूध, पपई, अंडी पालक यांचे सेवन करावे. डोळे लाल होणे असा त्राय असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, याकडे डॉ. अशोक मदान यांनी लक्ष वेधले.  

जेव्हा दृष्टी असेल तेव्हाच सृष्टी दिसेल
डॉ. मदान यांनी आपली दृष्टीच नसेल तर आपण खरोखरच सृष्टी कशी पाहू? असा प्रश्न त्यांनी केला. डोळ्याची काळजी घेण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. जास्त उन्हात फिरल्याने सूर्यापासून निघणारी किरणे डोळ्यात जातात आणि ते निकामी होतात तेव्हा डोळ्यांची  काळजी घ्या व जीवन सुरक्षित करा असाही सल्ला त्यांनी दिला आहे.