दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळपास संपण्याच्या मार्गावर आहेत, तर काही शाळांच्या परीक्षा सुरू आहेत. मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात उन्हाचा तडाखा जाणवत आहे. याचा अनेक विद्यार्थ्यांना फटका बसला असून शहरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या दिसून येत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी विशेषत: लहान मुलांच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
मार्च महिन्याच्या शेवटी उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून एप्रिलमध्ये ४२ अंश सेल्सिअसच्यावर तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शिवाय गेल्या काही दिवसात वातावरणातील बदलाचा लहान मुलांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. उन्हापासून बचाव करण्यासाठी विशेषत: लहान मुलांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकांनी सुद्धा जागृत असले पाहिजे. उन्हाळ्यामध्ये दरवर्षी गॅस्ट्रो आणि काविळाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात असतात.
यासंदर्भात बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांनी सांगितले, साधरणत: एप्रिल आणि मे महिन्यात जास्त उकाडा जाणवतो. अजून ४० अंशाच्यावर तापमान गेले नसले तरी ढगाळ वातावरणामुळे उकाडा जास्त जाणवतो. उन्हामुळे ताप वाढून डोके दुखणे, मळमळ व उलटय़ा होणे आणि कधी कधी फीट येणे ही लक्षणे मुलांमध्ये दिसून येतात. अनेकदा दूषित पाण्यामुळे काही आजार उद्भवतात. यामध्ये शरीरातील पाणी कमी होऊन अतिशुष्कता होऊ शकते. वातावरणातील बदल व हवेतील आर्दता यामुळे मुलांमध्ये विषाणूंचे संक्रमण होऊन खोकला व सर्दीसारखे विकार होत असतात.
मुलांची त्वचा नाजूक असते तेव्हा त्यावर सूर्य किरणांचा परिणाम होऊन त्वचा पोळली जाते व काळी पडण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या सुटय़ामध्ये बाहेर फिरणे, हॉटेलमध्ये अथवा उघडय़ावरील पदाथार्ंचा आस्वाद घेणे हे सुद्धा लहान मुलांच्या आरोग्यासाठी घातक आहे.
उघडय़ा अन्नावरील विषाणू व विषाणूयुक्त पाणी यातून आजार जडतो. तसेच दूषित बर्फामधून याचा फैलाव होत असतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मेयो रुग्णालयात वातानुकूलित वॉर्ड तयार ठेवण्यात आला आहे. शिवाय लहान मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. लहान मुलांच्या बाबतीत त्यांच्या पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. उलटय़ा किंवा तापाची लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांना दाखवा, असे आवाहन रुग्णालयातर्फे करण्यात आले.

हे करा..करू नका..
प्रखर उन्हाच्यावेळी मुलांना बाहेर जाऊ देऊ नये.
लग्न समारंभ किंवा अन्य कार्यक्रमांना दुपारच्यावेळी मुलांना नेणे टाळावे.
बाहेरील, उघडय़ावरील पदार्थ खाऊ नये.
उघडय़ावरील बर्फ, शीतपेय आणि उसाचा रस देऊ नये.
सुती व सैल कपडे घालावे. भरपूर पाणी प्यावे.
उन्हात फिरताना डोक्याला स्कार्फ, दुपट्टा बांधावा.
ताप आल्यास अंग पाण्याने पुसावे व औषध द्यावे.
अतिसार, शुष्कता झाल्यास जलसंजीवनीचा वापर करावा. ताप उतरत नसेल तर वेळीच बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Dissatisfaction among students over delay in Maharashtra Public Service Commission exams results interviews
‘एमपीएससी’च्या परीक्षा, निकालांची प्रतीक्षाच; अनेक परीक्षांचे अभ्यासक्रम प्रलंबित, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
Sassoon, pune, Sassoon dean,
ससूनमध्ये वाद पेटला! आयुक्तांच्या निर्णयाच्या विरोधात अधिष्ठात्यांची थेट भूमिका
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा