परमेश्वराने आपल्याला जे शरीर प्रदान केले आहे त्याचा जीवनात सत्कार्य करून ते सार्थकी लावण्याचा प्रयत्न करा, असे प्रतिपादन डॉ. नंदुरकर विद्यालयात आयोजित एका कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी मुंबईचे उद्योजक बी.के. वासुदेव यांनी केले. प्रमुख मार्गदर्शनात वासुदेव यांनी स्लाईड शो द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने विद्यालयात विविध उपक्रम आयोजित करण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वाचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात येतो.
नुकतेच पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक व सत्यसाई सेवा संघटनेचे महाराष्ट्राचे सेवादल प्रमुख बी.के. वासुदेव विद्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बी.के. वासुदेव, संस्थेच्या सदस्य लीला नंदुरकर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बावीस्कर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या गणपती अथर्वशीषाचे पठन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. मृण्मयी गोडे हिने प्रमुख अतिथींचा परिचय उपस्थितांना करून दिला. संस्थेच्या सदस्या लीना नंदुरकर यांच्या हस्ते वासुदेव यांचा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बावीस्कर यांच्या हस्ते लीनाताई नंदुरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत चावरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया फडणवीस यांनी तर आभार बावीस्कर यांनी मानले.