पुस्तकांच्या वाढत्या किमतीमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या आमदार पुस्तक पेढीतील पुस्तकांचा ३१ शाळांमधील दहा हजारहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. या उपक्रमांतर्गत इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके आ. नितीन भोसले यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. राज्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
आमदार स्थानिक विकास निधीतून या पुस्तक पेढीची निर्मिती करण्यात आली आहे. शासन इयत्ता ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके पुरविते, परंतु त्यापुढील इयत्तेतील विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहतात. ही बाब लक्षात घेत या उपक्रमाची संकल्पना मांडण्यात आल्याचे आ. भोसले यांनी नमूद केले. २०१३-१४ च्या आर्थिक वर्षांत पुस्तक पेढीच्या माध्यमातून ही संकल्पना प्रत्यक्षात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी ५४ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. गणेश चौक येथील पालिकेच्या शाळेत पुस्तक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. राज्यात प्रथमच असा उपक्रम होत आहे. आमदार निधीतून आधी केवळ संगणक, एलसीडी प्रोजेक्टर, जलशुद्धीकरण यंत्रणा यासारख्या बाबींवर खर्च करता येत होता. मात्र नवीन शासन निर्णयानुसार अध्यापन साहित्यावरदेखील खर्च करता येऊ शकतो. संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबविल्यास शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती घडेल, असा विश्वास आ. भोसले यांनी व्यक्त केला. शासनाने ही पुस्तके पुस्तक पेढीच्या माध्यमातून दरवर्षी शाळेत परत जमा करून मुलांना पुढील वर्षी वितरित केली तर महसुलात मोठी बचत होऊ शकते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या वेळी व्यासपीठावर अ‍ॅड. अभिजीत बगदे, विनोद नागरे, संदीप बोरसे, गोपी पगार, विठ्ठल गवांदे, मुख्याध्यापिका घोलप आदींसह प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.