समाजातील दुर्लक्षितांपर्यंत शिक्षणाची गंगा गेली तरच देश समृद्ध होईल, हा दृष्टिकोन ठेवून कर्मवीर रामराव आहेर यांनी कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या कसमादे विभागात शिक्षणाचा पाया भक्कम केला, असे प्रतिपादन वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी केले. येथे कर्मवीर रामराव आहेर यांचा १९वा स्मृतिदिन व पुतळा अनावरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सरचिटणीस नीलिमा पवार होत्या. कसमादे भागातील प्रत्येक व्यक्ती कसा सधन होईल, हा ध्यास घेऊन शिक्षणाची मुहूर्तमेढ कर्मवीरांनी रोवल्याचे विनायकदादांनी नमूद केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शांताराम आहेर, आ. शिरीष कोतवाल, मविप्र संचालक डॉ. विश्राम निकम, भरत कापडणीस, देवळा एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष सुशीला आहेर, माधव आहेर, प्राचार्य पी. एस. शेवाळे, प्राचार्य रावसाहेब शिंदे, प्राचार्य दिलीप शिंदे आदी उपस्थित होते. नीलिमा पवार यांनी कर्मवीरांनी केलेले कार्य अनमोल असल्याचे सांगितले. आजच्या मुलींना संरक्षणासाठी कराटेसारखे शिक्षण आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. या वेळी स्मृतिदिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धामध्ये यशस्वी झालेल्या गुणवंतांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रा. डॉ. कमल आहेर यांच्या ‘१९८० नंतरचे कुसुमाग्रज’ या ग्रंथाचे प्रकाशन या वेळी नीलिमा पवार व विनायकदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.