वडिलांच्या सततच्या मारहाणीमुळे नैराश्यग्रस्त झालेल्या मुलाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाल्याने उच्च न्यायालयाने आपल्या ११ वर्षांच्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल ओशिवरा येथील दिवाण सिंग या पित्याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा अलीकडेच सुनावली. या निकालानंतर पुन्हा एकदा मुलांसंदर्भातील शिस्त आणि शिक्षा याबाबत चर्चेचे मोहोळ उठले आणि पालक-शिक्षक वर्तुळात याबाबतच्या चर्चा झडू लागल्या. अनेकदा मुलाच्या शिस्त आणि शिक्षेच्या कल्पनेबाबत ‘आम्ही नाही का भोगल्या भलत्या भलत्या शिक्षा नि फोकाचा मार, आमचे काय वाईट झाले?’ असा पालकांचा अ‍ॅप्रोच असतो. मात्र आपण केलेल्या शिक्षेमुळे आपल्या मुलांच्या वर्तणुकीतले नकारात्मक वा हिंसक बदल त्यांना बावचळून टाकतात. तरीही आपल्या मारामुळे मूल आणखीच बिथरतंय, हेच पालक नाकारतात. अशा वेळेस मुलांची वर्तणूक सुधारण्याचा मूळ हेतू बाजूला राहून भलतंच त्रांगडं होऊन बसतं, जे पालकांच्या कह्य़ापलीकडचे असते आणि त्याबाबत नक्की काय उपाय योजायचे, हेच पालकवर्गाला कळेनासं होतं.  यानिमित्ताने शिस्त आणि शिक्षा याबाबतचा पालक-शिक्षकवर्गाचा अ‍ॅप्रोच कसा असावा, हे मुला-पालकांसोबत काम करणाऱ्या व्यक्तींकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता या सर्वानीच शिस्त आणि शिक्षा याचे सुतराम संबंध असण्याचे कारण नाही, हे ठामपणे सांगितले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आत्मसन्मान दुखावतो..
मुलांच्या वर्तणुकीच्या समस्येने त्रस्त असलेले पालक जेव्हा मुलांना आमच्याकडे घेऊन येतात, त्या मुलांशी बोलताना जाणवतं की, या सगळ्याच्या मुळाशी कुठेतरी पालकांची मुलांशी असलेली वागणूक कारणीभूत आहे. मुलांचा विश्वास संपादन करून त्यांच्याशी बोलताना स्पष्ट होतं की, आई-बाबांच्या मनाविरुद्ध घडल्यानंतर ते करत असलेल्या शिक्षेमुळे मुलं बेजार झाली आहेत. अनेक प्रकरणांमध्ये उच्चशिक्षित पालकांनीही मुलांना चटके देणं, उपाशी ठेवणं, मारणं, रात्री घरातून बाहेर काढणं, वारंवार धमकी देणं असे गैरप्रकार केल्याचं स्पष्ट होतं. आई-वडिलांच्या अशा वर्तनाचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर खोल परिणाम होतो. अशा वेळेस मुलं स्वत:चं नुकसान करून घेतात, अन्यथा वाईट मार्गाला लागतात. अशा शिक्षांना सामोरे जावं लागलेल्या मुलांचा आत्मविश्वास डळमळीत होतो, त्यांचा आत्मसन्मान दुखावतो. त्यांच्यातील भयगंड, न्यूनगंड वाढतो. अमली पदार्थाचं व्यसन लागण्यामागचं कारण हेही असू शकतं. उलटपक्षी, काही मुलं अधिकच हिंसक होतात. घरात पालकांचा मार सहन करणारी मुलं बाहेर आपला राग इतरांवर काढतात. खेळताना वा शाळेत इतर मुलांना मारणं, शिक्षकांचं वा इतर मोठय़ा व्यक्तींचं न ऐकणं, उलट उत्तरं देणं हा या मुलांचा स्वभाव बनतो. असहाय्यपणे पालकांचा मार खाणारी ही छोटी मुलं मोठी झाली की, आई-वडिलांवर हात उगारायला कमी करत नाहीत. त्यांचं स्वत:चं कुटुंब जेव्हा बनतं, तेव्हा ही मुलं आपल्या जोडीदारावर नाहीतर मुलांवर मनात वर्षांनुर्वष दडपलेला राग काढू लागतात. मुलाला शिस्त लावताना पालकांनी हे लक्षात घ्यायला हवं की, शिस्त वेगळी आणि धाक वेगळा. ‘आम्हाला तू आवडतोस, मात्र तुझी ही वर्तणूक रुचत नाही,’ असं सांगत मुलाच्या वर्तणुकीत बदल होण्यासाठी पालकांनी त्याला विश्वासात घेऊन बोलतं करायला हवं. त्याऐवजी जर मुलाला घरच्यांकडून नकार मिळाला तर त्याला व्यक्तिमत्त्वाचा डोलारा कोसळू शकतो.
    डॉ. अजय ताम्हाणे, मानसोपचारतज्ज्ञ

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There should be no any relationship between panishment and shiksha
First published on: 04-12-2012 at 11:30 IST