भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची निवड पक्षाच्या विधिमंडळाच्या नेतेपदी झाल्यानंतर उद्या, शुक्रवारी मुंबईला होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला विदर्भातून हजारो कार्यकर्ते मुंबईकडे मिळेल त्या वाहनाने रवाना झाले आहे तर काही यापूर्वी रवाना झालेले आहेत. जनसंघाच्या काळापासून काम करणारे पक्षाचे विदर्भातील अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसाठी भाजपने मुंबईला जाण्यासाठी शुक्रवारी सकाळी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे.
अनेक वर्षांंनंतर विदर्भाला भाजपचे युवा आणि डायनामिक नेते देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने मुख्यमंत्रीपद मिळाल्याने शपथविधी सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी विदर्भातून हजारो कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहे. मंगळवारी आणि बुधवारी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते खासगी गाडय़ाने आणि रेल्वेने रवाना झाले आहे. नागपुरातून विदर्भ एक्सप्रेसने तीन हजारच्या जवळपास कार्यकर्ते उपेंद्र कोठेकर आणि प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांच्या नेतृत्वात रवाना झाले.
 विदर्भ एक्सप्रेसला त्यासाठी दोन अतिरिक्त डब्बे जोडण्यात आले आहे. अमरावती, अकोला, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा या जिल्ह्य़ातून भाजपचे कार्यकर्ते मिळेल त्या वाहनाने रवाना झाले. महापौर प्रवीण दटके, स्थायी समिती अध्यक्ष बाल्या बोरकर यांच्यासह महापालिकेचे ५० पेक्षा अधिक नगरसेवक आणि जिल्हा परिषदेचे सदस्य रेल्वे आणि विमानाने मुंबईला रवाना झाले. सायंकाळी रेल्वे स्थानकावर विदर्भ एक्सप्रेसने जाण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांंची गर्दी दिसून आली. मुंबईला जाणाऱ्या विमानाची तिकिटे मिळत नसल्याने विदर्भातील अनेक भाजपचे कार्यकर्ते रेल्वे आणि खासगी वाहनाने निघाले. शिवाय अमरावती- मुंबई एक्सप्रेसने हजारो कार्यकर्ते घोषणा देत रवाना झाले.