scorecardresearch

वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे त्रिकूट जेरबंद

सध्या महाविद्यालयीन प्रवेशाच्या प्रक्रिया सुरू आहेत. डॉक्टर होऊ इच्छिणारे मात्र कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांला त्याच्या पसंतीचे महाविद्यालय मिळण्याची संधी कमी असल्याने अनेक पालकांचा पाल्यासाठी व्यवस्थापन कोटय़ातून प्रवेश घेण्याकडे अधिक कल असतो.

सध्या महाविद्यालयीन प्रवेशाच्या प्रक्रिया सुरू आहेत. डॉक्टर होऊ इच्छिणारे मात्र कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांला त्याच्या पसंतीचे महाविद्यालय मिळण्याची संधी कमी असल्याने अनेक पालकांचा पाल्यासाठी व्यवस्थापन कोटय़ातून प्रवेश घेण्याकडे अधिक कल असतो. यासाठी महाविद्यालयाकडून मागण्यात येणारी भरमसाट देणगी मोजण्यास ते तयार असतात. अशा पालकांना हेरून त्यांच्या मोबाइलवर व्यवस्थापन कोटय़ातून प्रवेश मिळवून देण्याचा संदेश पाठवायचा. यानंतर या संदेशावर विश्वास ठेवून पाल्याला नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहून संदेशात दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून व्यवहार करणाऱ्या पालकांची फसवणूक करणाऱ्या त्रिकुटाचे भांडाफोड नेरुळ पोलिसांनी केले आहे. यामुळे तुमच्या मोबाइलवर हमखास प्रवेश मिळवून देण्याचा संदेश आला असून त्यावर विश्वास ठेवून प्रवेश घेण्यासाठी संपर्क करणार असाल तर सावधान. कारण नेरुळ पोलिसांनी जेरबंद केलेल्या त्रिकुटाने विविध राज्यांतील अनेक पालक-विद्यार्थ्यांची प्रवेशाच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.
डॉ. अरुणेश्वर कृष्णकुमार वर्मा (५४, रा. बिहार), सुमन ऊर्फ सुबोध स्वरूप पात्रा (२४, रा. पुणे) आणि त्रिभुवन रामराज पांडे (३५, रा. सांताक्रुझ) असे या अटक आरोपींची नावे आहेत. उत्तराखंड येथील डॉ. राजेश पांडे आणि शेतकरी असलेले राजकुमार तेजवाणी यांची या त्रिकुटाने अशाच पद्धतीने फसवणूक केली आहे. पांडे आणि तेजवाणी यांच्या भावाचा मुलगा दीपक तेजवाणी यांच्या मोबाइलवर संदेश पाठवत या त्रिकुटाने नेरुळमधील तेरणा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याची हमी दिली होती. तसेच महाविद्यालयाचे शैक्षणिक शुल्क डीडी स्वरूपात घेणार असल्याचे त्यांनी सांगितल्याने पांडे आणि तेजवाणींचा त्याच्यावर विश्वास बसला होता.
या त्रिकुटाने पांडे यांच्याकडून तेरणा महाविद्यालयाजवळ असलेल्या द्वारका हॉटेलमध्ये ३ लाख ९० हजारांचा डीडी आणि देणगी म्हणून १८ लाख रुपये घेतले. यानंतर महाविद्यालयाचे प्रवेश निश्चितीचे पत्र त्यांना दिले होते. मात्र दुसऱ्या दिवशी महाविद्यालयात पांडे याचा मुलगा गेला असता सदरचे पत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. याच पद्धतीने तेजवाणी यांच्याकडूनदेखील सुमारे २३ लाख रुपये या त्रिकुटाने घेतले होते.
यातील मुख्य आरोपी वर्मा याने महाविद्यालयाच्या विश्वस्थाची भूमिका पार पाडली होती. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात पांडे यांनी नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी तपास सुरू असताना वर्मा हा एकाकडून प्रवेशाचे शुल्क स्वीकारण्यासाठी येणार असल्याची माहिती नेरूळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता शिंदे-अल्फोन्सो यांना खबऱ्याकडून मिळाली. या माहितीच्या आधारे द्वारका येथे नेरुळ पोलिसांनी सापळा लावला होता. या ठिकाणी पैसे स्वीकारण्यासाठी आलेला वर्मा पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुमन पात्रा आणि त्रिभुवन पांडे यांना अटक करण्यात आली.
या त्रिकुटाने २००९ पासून नेरुळ येथील तेरणा वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथील सोमैया महाविद्यालय, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, बिहारमधील कटियारा वैद्यकीय महाविद्यालय, कृषीनगर वैद्यकीय महाविद्यालय, झारखंड येथील रांची वैद्यकीय महाविद्यालय व धनपाल पाटलीपुत्र आणि सुरत विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली असल्याची माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली आहे. यापूर्वी बंगलोर, मैसूर येथील पोलिसांनी वर्मा आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. पालकांनी अशा संदेशांना बळी पडू नये, असे आवाहन मेंगडे यांनी केले आहे.

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-07-2014 at 07:23 IST

संबंधित बातम्या