निवडणूक आयोगाने स्थापन केलेल्या भरारी पथकांनी विदर्भात विविध ठिकाणी केलेल्या तपासणीत ३ कोटी दोन लाखांची रोकड जप्त करण्यात आली.
यवतमाळ जिल्ह्य़ात चार ठिकाणी केलेल्या वाहनांच्या तपासणीत सहा लाख रुपये जप्त करण्यात आले. जिल्ह्य़ातील सात विधानसभा मतदारसंघात लढत असलेल्या १०३ उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराची  किंवा राजकीय पक्षाची ही रक्कम नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन प्रकरणात तेल व्यापाऱ्याची आणि एका प्रकरणात बँकेची ही रक्कम असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.  एका प्रकरणात एसटी बसमधून शाळेत जाणाऱ्या  विद्यार्थ्यांच्या पुस्तकांच्या बॅगमध्ये दोन लाख रुपये आढळून आले.
चंद्रपूर जिल्हय़ात आतापर्यंत ६१ लाखांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे. दरम्यान, यात राजकीय पक्षांशी संबंधित एकही प्रकरण नाही. सर्व रक्कम ही व्यापारी व खासगी कंपनीची आहे. आचार संहिता लागू झाल्यानंतर छत्तीसगड, तेलंगणा व आंध्रप्रदेशच्या सीमा सील करण्यात आलेल्या आहेत. अशाही स्थितीत खासगी वाहनांमधून मोठय़ा प्रमाणात रकमेची ने-आण होत असल्याने प्रत्येक नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू आहे. याच तपासणीतून आतापर्यंत जिल्हय़ात ६१ लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे. सर्वाधिक २० लाखांची रोकड ही ब्रम्हपुरी येथे जप्त करण्यात आली होती. ही रक्कम ही वीज कंपनीच्या कंत्राटदाराची होती. याच ठिकाणी ३.५० लाखाची रक्कम जप्त केली होती. खांबाडा नाका येथेसुध्दा पाच लाखांची रक्कम जप्त करण्यात आली. दरम्यान, ही जप्त केलेली सर्व रक्कम जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठेवण्यात आली आहे. संबंधित रकमेसंदर्भात आयकर विभागाला माहिती देण्यात आलेली असून संबंधित व्यक्तीने रकमेचा हिशेब दिल्यानंतर त्याला ती परत केली जाईल, असेही सांगण्यात आले. राजकीय पक्षाचे प्रतिनिधी तसेच निवडणूक प्रतिनिधी यांनी ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम बाळगू नये, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. रक्कम मिळाल्यास कारवाईला सामोरे जावेच लागेल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
नक्षलग्रस्त गडचिरोलीत आतापर्यंत २० लाखांची रोक जप्त करण्यात आलेली आहे. येथेही एकाही राजकीय पक्षाचे नेते किंवा पदाधिकाऱ्यांच्या वाहनातून नव्हे तर व्यापाऱ्यांच्या वाहनातून रक्कम जप्त केल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी यांनी दिली. ही रक्कम अहेरी, सिरोंचा व मुलचेरा परिसरात जप्त करण्यात आलेली आहे. सिरोंचा व अहेरी परिसरात एका कंत्राटदाराकडूनच ही रक्कम जप्त करण्यात आली.
नागपुरात एका वाहनात ७० लाख रुपये सापडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही रक्कम मतदारांना वाटण्यासाठी जात होती की आणखी कुठे, याचा उलगडा शुक्रवारी सायंकाळपर्यंत झाला नव्हता. याप्रकरणी स्वीफ्ट चालक दिलीप वातूजी कोडाणे (४५), रा. चेतेश्वरनगर, याची पोलिसांनी चौकशी केली. त्याने ही रक्कम सिव्हिल लाईन्समधील अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्याने दिल्याचे सांगितले. ही कार पुष्पा अग्रवाल यांच्या मालकीची आहे. त्यांनी ही रक्कम राजनांदगाव येथील बिल्डर असलेल्या जावयाची असल्याचे सांगितले. गोंदिया जिल्ह्य़ातून ३० लाख, २९ हजारांची रोख जप्त करण्यात आली. १२ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाल्यानंतर आतापर्यात ही रक्कम भरारी पथकाने जप्त केली आहे. दरम्यान, ३ लाख ४ हजार रुपयांची अवैध दारूदेखील जप्त करण्यात आली असून आचारसंहिता उल्लंघनाच्या ३२ प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी भरारी पथकाद्वारे वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
अकोटमध्ये भाजपचे उमेदवार प्रकाश भारसाकळे यांच्यासाठी आणण्यात आलेले दीड लाख रुपये पकडले आहेत. मूर्तिजापूर येथे एका हॉटेलवर छापा घालून पोलिसांनी पाच लाख रुपये जप्त केल, असे वृत्त पसरले होत, त्यास दुजोरा मिळू शकला नाही. पोलीस निरीक्षक नागरे, त्यांचे सहायक विजय इंगळे, मोहसीन यांनी नजर ठेवली. वाशीम जिल्ह्य़ातील मानोरा येथील मनीष अनिल भाकरे हा पोलीस ठाण्यासमोरून जात असता त्याच्या संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले व त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ दीड लाख रुपये रोख आठळून आले. हे पैसे त्याने कोठून आणले याची चौकशी केली असता अकोट मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रकाश भारसाकळे यांचे मानोरा येथील जावई अमोल इंगोले यांच्या सांगण्यावरून ही रोख रक्कम आणल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
‘ती’ रक्कम बँकेची
मूर्तिजापुरात शुक्रवारी नागपूरहून निघालेल्या आयसीआयसीआय बँकेची व्हॅन कोहिनूर धाब्याजवळ रोखण्यात आली. त्यात ९कोटी, ७२ लाख रुपये होते. पोलिसांनी लगेच ही व्हॅन पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली. तेव्हा विविध एटीएममध्ये भरण्यासाठी बँकांना सेवा देणारी ती रोख रक्कम होती, असे संबंधितांनी पोलिसांना सांगितले. तरीही एवठी मोठी रक्कम पाहून मूर्तिजापूर पोलीस अधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांनी थेट मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या कानावर ही बाब घातली. मारिया यांनी संबंधित बँकेच्या अधिका-यांकडे याबाबत विचरणा केली असता ती रोख रक्कम बँकेच्या एटीएमसाठीच असल्याचे स्पष्ट झाल्यावर ही रक्कम असलेली व्हॅन सोडून देण्यात आली. चिखली ते जाफ्राबाद मार्गावरील भोकर वाडी शिवारात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एका गाडीची तपासणी करून त्यामधील ८० लाख रुपये जप्त केले.  चौकशीदरम्यान उपरोक्त रक्कम चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सिल्लोड शाखेतून त्या गाडीमध्ये चिखली येथे घेऊन येत असल्याचे उघडकीस आले. बेकायदेशीर रोख रक्कम बाळगल्याप्रकरणी निवडणूक कार्यालयाने एक कारवाई केली असून पाच लाख रुपयाची रोकड जप्त केली.