विवाहितेवर दोघा नराधमांनी अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे या असहाय झालेल्या विवाहितेने विषारी औषध घेऊन जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी वाळकी येथील दोन नराधमांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याविरुद्ध बलात्कार व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करून शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी संपत मगन पवार (वय २२) व रशीद रफीक पठाण (वय २३) यांना या प्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की राहाता तालुक्यातील वाळकी येथील विवाहित महिला शेतातील पाचटाच्या झोपडीत एकटीच आहे हे पाहून या दोघा आरोपींनी झोपडीत घुसून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. यानंतर घटनेबद्दल वाच्यता केल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी देऊन आरोपी पळून गेले. ही घटना बुधवारी दुपारी एकच्या दरम्यान घडली.
असहाय झालेल्या विवाहितेने थेट आत्महत्येचाच प्रयत्न केला. घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला तात्काळ साईबाबा संस्थानच्या साईबाबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. वैद्यकीय उपचारानंतर शुक्रवारी ही महिला शुद्धीवर आली. विषारी औषध का घेतले, याबाबत विवाहितेच्या घरच्यांनी चौकशी केली असता तिने हा प्रकार सांगितला. महिलेच्या पतीने याबाबत राहाता पोलिसांना दूरध्वनीवरून कल्पना दिली. पोलीस निरीक्षक भागवत जायभाय यांनी वाळकी येथे जाऊन पीडित महिलेचा जबाब घेऊन पंचानामा केला. तिने दिलेल्या फिर्यादीवर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून आज दुपारी त्यांना अटक केली. पोलीस निरीक्षक भागवत जायभाय पुढील तपास करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Torture to married near rahata
First published on: 26-10-2013 at 01:54 IST