पर्यटनासोबतच रोजगारात वाढ होण्याची शक्यता
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, आनंदवन, महाकाली व मरकडा मंदिर, भद्रावतीच्या ऐतिहासीक गुफा व जैन मंदिर, सोमनाथ व परिसरातील पर्यटन स्थळ बघता या तसेच लगतच्या गडचिरोली जिल्हय़ात पर्यटन एमआयडीसीला मोठय़ा प्रमाणात वाव आहे. त्या दृष्टीने प्रयत्न केल्यास पर्यटनासोबतच रोजगारात वाढ होईल अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केल्या.
औद्योगिकदृष्टय़ा प्रगतीपथावर असलेल्या या जिल्ह्य़ावर निसर्गाची असीम कृपा आहे. या शहराला चारही बाजूने घनदाट जंगल आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने या जिल्ह्य़ाची नोंद जगाच्या नकाशावर झालेली आहे. ६२५ चौरस किलोमीटरचा हा प्रकल्प वाघ, बिबट, हरण, चौशिंगा, अस्वल, हत्ती व सांबर या वन्यप्राण्यांसाठी प्रसिध्द आहे. केवळ वन्यप्राणीच नाही, तर पक्षी, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे, विविध जातीची झाडांसह असंख्य बाबी ताडोबाच्या जंगलात आहेत. दरवर्षी हजारो पर्यटक या प्रकल्पाला भेट देतात. पर्यटकांच्या राहण्यासाठी येथे हॉटेल्स, मोटल्स, फार्म हाऊस व एमटीडीसीचे विश्रामगृह आहे, मात्र तरीही पाहिजे तसा पर्यटन उद्योग येथे विकसित झालेला नाही. पर्यटन उद्योगावर आधारित एमआयडीसी येथे विकसित केली तर त्याला निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल, अशी प्रतिक्रिया एमआयडीसीचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा यांनी व्यक्त केली. केवळ ताडोबा प्रकल्पच नाही, तर जुनोना तलाव व इरई डॅम, आनंदवन, महाकाली व मरकडा मंदिर, भद्रावतीच्या ऐतिहासिक गुंफाही या जिल्ह्य़ात आहेत. पर्यटक एकदा येथे आला की, त्याला जिल्ह्य़ातील सर्व पर्यटनस्थळांचे दर्शन घडवायचे. त्या निमित्ताने पर्यटनावर आधारित उद्योग जसे हॉटेल्स, मॉटेल्स, टूर अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स, धाबे, जिप्सी व याच्याशी संबंधित अनेक बाबी उपलब्ध करून द्यायच्या, असेही ते म्हणाले.
या जिल्ह्य़ात विदेशी पर्यटक संख्येने अधिक येत असल्याने अतिशय चांगले पर्यटन केंद्र विकसित होऊ शकते, मात्र राज्य शासनाने ही बाब तेवढय़ाच गांभीर्याने घेतली तर त्याला यश मिळेल, असेही ते म्हणाले. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सिंधूदुर्ग जिल्ह्य़ात हा प्रकल्प राबविण्याचा विचार केला आहे. सिंधूदुर्गसोबतच या जिल्ह्य़ातही पर्यटन उद्योग सुरू झाले तर रोजगार निर्मिती निश्चितच होईल, असेही ते म्हणाले. ताडोबासोबतच या जिल्ह्य़ात इतरही असंख्य गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. चारगाव धरण, रामदेगी, सोमनाथ, भद्रावतीचे जैन मंदिर, बीरशाहची समाधी व इतर अनेक पर्यटन स्थळ आहेत. त्या दिशेने या सर्वाचा विकास केला, तर पर्यटन एमआयडीसी निश्चित यशस्वी होईल, अशी प्रतिक्रिया हाय फ्लाय अ‍ॅश प्रा.लि.चे अध्यक्ष प्रवीण जानी यांनी व्यक्त केली. नैसर्गिकदृष्टय़ा समृध्द असलेल्या या जिल्ह्य़ात चुनखडी, लोह खाणी, फ्लाय अ‍ॅश, कोळसा, पाणी व उद्योगासाठी आवश्यक इतर कच्चा माल सहज उपलब्ध आहे. त्यामुळेच येथे उद्योग उभे करणे सहज सोपे आहे.
त्याच धर्तीवर निसर्गाने जंगलाच्या रूपाने अव्दितीय भेट दिल्याने येथे पर्यटन उद्योगही अतिशय चांगला विकसित होऊ शकतो. या जिल्ह्य़ात वर्षांला किमान ७० हजार देशी-विदेशी पर्यटक येतात. एवढय़ा मोठय़ा संख्येने पर्यटकांनी भेट दिल्यानंतर त्याचा पर्यटन उद्योगात कसा सहभाग करून घ्यायचा, याचाही विचार केला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले. पर्यटनावर आधारित छोटे उद्योग तर येथे निश्चितच विकसित होऊ शकतात, असे ते म्हणाले. केवळ चंद्रपूरच नाही, तर लगतच्या गडचिरोलीत पर्यटन उद्योगाला चांगले दिवस असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक व जलबिरादरीचे संयोजक संजय वैद्य यांनी व्यक्त केली. गडचिरोलीतील नक्षलवाद ही समस्या सोडली तर निसर्गरम्य भामरागड, सिरोंचा, हेमलकसातील लोकबिरादरी प्रकल्प, मरकडा, प्राणहिता व वैनगंगा नदी, तसेच आंध्र, छत्तीसगड व महाराष्ट्र अशा तीन राज्यांचे सीमास्थळ, अशा अनेक गोष्टी पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करता येऊ शकतात. केवळ त्याकडे सरकारने गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.