मतदानाच्या जाहीर प्रचाराचा अखेरचा दिवस शहरातील वाहनधारकांची परीक्षा पाहणारा ठरला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी शहरातील मध्यवस्तीत जशी अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली, काहीसा तसाच प्रकार मंगळवारी वेगवेगळ्या भागांत घडला. राजकीय पक्षांचे शक्तिप्रदर्शन वाहनधारक, परिसरातील व्यावसायिक व नागरिकांना महाग पडले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी परमोच्च बिंदूवर पोहोचली. जाहीर प्रचाराचा हा शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक राजकीय पक्षाने शक्तिप्रदर्शनात कोणतीच कसूर सोडली नाही. काँग्रेस आघाडीने मध्यवर्ती भागात भव्य प्रचारफेरी काढली. या फेरीमुळे महात्मा गांधी रस्त्यावरील वाहतूक सकाळी दहापासून बंद करावी लागली. या पक्षाच्या नेत्यांनी आपली वाहने सांगली बँक सिग्नल ते मेहेपर्यंत उभी करून ठेवल्याने फेरी मार्गस्थ झाल्यावरही वाहतुकीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नव्हती. अशोकस्तंभावरून रविवार कारंजा, मेनरोड, खडकाळी, एन. डी. पटेल रोड, सीबीएस मार्गे काँग्रेस कमिटी असा या फेरीचा मार्ग होता. यामुळे पोलिसांनी मालेगाव मोटार स्टँड चौकात लोखंडी जाळ्या टाकून वाहतूक रोखून धरली. पंचवटीतून रविवार कारंजाकडे येऊ इच्छिणाऱ्या वाहनधारकांना रामवाडीचा पर्याय स्वीकारावा लागला. काँग्रेस आघाडीच्या फेरीत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले असल्याने मेनरोड, दामोदर चित्रपटगृह, खडकाळी, असे सर्व भाग वाहतूक कोंडीच्या कचाटय़ात सापडले. पोलिसांनी ठिकठिकाणची वाहतूक रोखून धरल्याने वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. प्रचारफेरीमुळे मुख्य बाजारपेठेतील दैनंदिन आर्थिक व्यवहारही थंडावल्याची प्रतिक्रिया व्यापारी वर्गाने व्यक्त केली. मनसेतर्फे मोटारसायकल फेरी काढण्यात आली होती. त्याचाही फटका अन्य वाहनधारकांना सहन करावा लागला. पंचवटी कारंजा येथून निघालेल्या फेरीने मखमलाबाद नाका, मखमलाबाद गावापर्यंत, नंतर दिंडोरी रोड, पंचवटी कारंजा, जुना व नवीन आडगाव नाका या परिसरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. त्यात अनेक वाहनधारक अडकून पडले. अहिल्यादेवी होळकर पुलावरील वाहतूक बंद केल्यामुळे शहर बसेस व अन्य वाहने मखमलाबाद नाकामार्गे अशोकस्तंभ व रामवाडीकडून मार्गस्थ झाली. हे रस्ते आधीच चिंचोळे असल्याने परिसरातील वाहतूक कित्येक तास विस्कळीत झाली. महायुतीच्या प्रचार फेरीने सीबीएस, शरणपूर रोड, कॉलेजरोड, गंगापूर रोड आदी भागांतील वाहतूक विस्कळीत केली. पदयात्रेद्वारे निघालेल्या फेरीमुळे एका बाजूकडील वाहनांना अन्य रस्ते शोधणे क्रमप्राप्त ठरले. या कारणास्तव काही वाहनधारकांनी वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली. प्रचारासाठी कार्यकर्त्यांची अनेक वाहनांतून वाहतूक करण्यात आली. खच्चून भरलेल्या या वाहनांकडे पोलिसांनी दुर्लक्ष करण्याची भूमिका स्वीकारल्याचे दिसून आले.