पीक पाहणी नोंद प्रकरणी तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी पाच हजार रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या दिंडोरी येथील नायब तहसीलदारास शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आली.
दिंडोरी तालुक्यातील मौजे सारोसे येथे तक्रारदार व त्यांच्या भावाची शेती आहे. शेतातील पीक पाहणी करून महसुली दस्तावेजात नोंद करण्यासाठी तक्रारदाराने तलाठय़ाकडे अर्ज केला होता. तलाठी यांनी हे अर्ज तहसील कार्यालयात चौकशीसाठी सादर केले होते. नायब तहसीलदार प्रविण रघुनाथ चव्हाणके हे या अर्जाची चौकशी करत होते. चौकशी करून तक्रारदाराच्या भावाच्या बाजूने निकाल देण्यासाठी चव्हाणके यांनी १० हजार रूपयांची मागणी केली. त्यात तडजोड होऊन  पाच हजार रूपये देण्याचे ठरले. त्यानुसार शुक्रवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास तहसील कार्यालयात लाच स्वीकारत असताना चव्हाणके यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.