उरण परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून शुक्रवारसह मंगळवारीही करण्यात आलेली पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. जून महिन्यात उरण तसेच रानसईच्या धरण परिसरात आतापर्यंत ५२४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे ११६ फूट क्षमता असलेल्या रानसई धरणात १०६ ते १०७ फूट इतका पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती उरणच्या एमआयडीसी विभागाने दिली आहे.
दहा दशलक्ष घन मीटर पाणी साठवणुकीची क्षमता असलेल्या रानसई धरणाची उंची ११६ फूट आहे. धरणाची पाणी पातळी कमी झाल्याने पाणीकपात म्हणून आठवडय़ातील शुक्रवारप्रमाणेच मंगळवारीसुद्धा उरण तालुक्यात एमआयडीसीने पाणीकपात जाहीर केली होती. त्यामुळे नागरिकांना आठवडय़ातील दोन दिवस पाणीकपातीला सामोरे जावे लागत होते. जूनमध्येच मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे.
त्यामुळे उरण तालुक्याला रानसई धरणातूनच पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी पातळी वाढल्याने मंगळवारी सुरू करण्यात आलेली पाणीकपात रद्द करण्यात आल्याची माहिती उरणच्या एमआयडीसीचे उपअभियंता एम.के.बोधे यांनी दिली आहे. मध्यंतरी आठवडाभर महावितरण विभागाकडून होणाऱ्या अनियमित वीजपुरवठय़ामुळे अनेक ठिकाणी पाणी पुरविणे शक्य झाले नव्हते, मात्र मंगळवारची पाणीकपात यापूर्वीच रद्द करण्यात आली आहे. मात्र, शुक्रवारची कपात सुरूच राहणार असल्याची माहिती बोधे यांनी दिली.