कोणताही भक्कम आधार नसल्याने आयुष्याची संध्याकाळ शांतता व आर्थिक सुरक्षिततेत व्यतीत करण्यासाठी त्या दाम्पत्याने नियोजन केले खरे, परंतु त्यासाठी गुंतविलेल्या रकमेतच फसगत झाल्यामुळे शहरातील या वयोवृद्ध दांम्पत्यावर न्यायालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे.
  थोडाथोडका नव्हे तर, एक तपांचा कालावधी त्यांच्या या लढय़ास झाला आहे. न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला असला तरी हक्काची रक्कम त्यांच्या हाती पडू शकलेली नाही. आपले पैसे मिळविण्यासाठी जवळ आहे ते देखील गमावून बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आयुष्याच्या सायंकाळसाठी रचलेल्या स्वप्नांचे इमले असे कोसळत चालल्याने हतबल झालेले हे दाम्पत्य आजही न्यायालयाकडे आशेने डोळे लावून बसले आहे.
ओझरच्या हिंदुस्तान एरोनॉटीक्स कारखान्यातून अभियंता पदावरून निवृत्त झालेले ८० वर्षांचे वसंत चांदोरकर आणि त्यांच्या पत्नी सुनिता यांची ही कथा वयोवृद्धांना भेडसावणाऱ्या समस्येचा वेगळाच पदर उलगडवणारी. त्यांची चूक एवढीच की, जवळची काही रक्कम ओळखीचा एक दलाल चंद्रकांत शंकर शौचे याच्यामार्फत त्यांनी १९९४ मध्ये समभागात गुंतविली. सुनिता चांदोरकर यांच्या नांवावरील त्या समभागांची विक्री झाल्यावर संबंधिताने काही कारण दाखवून ही रक्कम स्वत:कडे ठेऊन घेतली. पुढील दोन ते तीन वर्ष पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने या दांम्पत्यास अखेर न्यायालयात धाव घेण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नाही. पैसे वसुलीसाठी त्यांनी येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला.
न्यायालयाने दोन्ही बाजुंचे म्हणणे जाणून घेत ३,३५,३०१ रूपये आणि दावा दाखल केल्याच्या तारखेपासून १२ टक्के दराने होणारे व्याज व दाव्याचा खर्च अशी रक्कम शौचेने सुनिता चांदोरकर यांना द्यावी, असा हुकुमनामा मंजूर केला. ही रक्कम न्यायालयात दरमहा १,००० रूपयेप्रमाणे जमा करावी, असे आदेशही दिले.
त्यानुसार संबंधिताने साधारणत: २२ ते २४ महिने पैसे जमा केले. परंतु नंतर कोणतेही कारण न देता हे पैसे जमा करणे बंद केले. यामुळे चांदोरकर यांनी न्यायालयात ‘स्पेशल दरखास्त’ दाखल केली. त्यात संबंधिताची आर्थिक परिस्थिती सर्व रक्कम एकरकमी भरण्याइतकी असल्याचे सांगून कायद्यातील विविध पळवाटांचा आधार घेऊन ते रक्कम देण्याचे टाळत असल्याची बाब चांदोरकर यांनी नमूद केली.
आपल्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. वैद्यकीय कारणास्तव चार ते पाच हजार रूपये दरमहा खर्च करावे लागतात. महागाईच्या काळात दैनंदिन गरजा भागविणेही कठीण झाल्याची बाबही चांदोरकर दाम्पत्याने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर न्यायालयाने सर्व रक्कम भरण्याचे आदेश शौचेला दिले. तथापि, त्याने ही रक्कम अद्याप न्यायालयात जमा केली नसल्याची चांदोरकर दाम्पत्याची कैफियत आहे. संबंधिताने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याची तक्रारही करण्यात आली असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. चांदोरकर दाम्पत्य आपले पैसे मिळविण्यासाठी या वयातही प्रत्येक तारखेला न्यायालयात उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतात. आयुष्याची संध्याकाळ आर्थिक सुरक्षिततेत घालविण्याचे इतरांप्रमाणे त्यांचेही स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न भंगण्याची वेळ आली आहे. आता चांदोरकर दाम्पत्याला आशा आहे, ती केवळ न्यायालयाची.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twelve years struggle for justice by an old couple
First published on: 28-05-2013 at 03:49 IST