भरधाव जाणाऱ्या वाहनांची ठोकर बसून झालेल्या वेगवेगळ्या दोन अपघातामध्ये एका युवतीसह दोन पादचारी मृत्युमुखी पडले. चतुश्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हे दोन्ही अपघात घडले.
भरधाव जाणारी इंडिका मोटारीची ठोकर बसल्याने पायी जाणाऱ्या २६ वर्षांच्या अज्ञात युवतीचा बळी गेला. मुंबई-बंगलोर महामार्गावरील पाषाण परिसरातील सुतारवाडी भागात रविवारी (१७ फेब्रुवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या युवतीला उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान या युवतीचा मृत्यू झाला. अपघाताची खबर न देता यामध्ये जखमी झालेल्या युवतीला कोणत्याही प्रकारे मदत न केल्याच्या आरोपावरून चतुश्रुंगी पोलिसांनी सावळाराम कदम (वय ४२, पुष्पराज सोसायटी, खोंडगेवाडी, लोणावळा) यांच्याविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे.  वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून भरधाव जाणाऱ्या मोटारीची ठोकर बसल्याने झालेल्या अपघातामध्ये रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या राजेश रामगोपाल सिंग (रा. मिटकॉन कॉलेजसमोर, बालेवाडी) या युवकाचा मृत्यू झाला. बालेवाडी जकात नाका परिसरामध्ये रविवारी (१७ फेब्रुवारी) सायंकाळी हा अपघात घडला. याप्रकरणी सुनीलकुमार रामगोपाल सिंग (वय २८, रा. बालेवाडी) यांनी फिर्याद दिली असून चतुश्रुंगी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वाळवेकर पुढील तपास करीत आहेत.