प्रवासाच्या टप्प्यात बदल करून बस प्रवाशांना जोरदार दरवाढीचा दणका देणाऱ्या ‘बेस्ट’च्या या चलाखीचा फटका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या लाडक्या ‘फोर्ट फेरी’ बससेवेलाही बसला आहे. ‘बेस्ट’च्या करामतीमुळे सहा रुपयांचे तिकीट थेट १० रुपये झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना तब्बल ६६ टक्क्यांच्या दरवाढीला सामोरे जावे लागले आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर २०११-१२ मध्ये मोठा गाजावाजा करीत ‘फोर्ट फेरी’ या नावाने बससेवा सुरू झाली. त्यासाठी एक आणि दोन या क्रमांकाच्या बस दोन दिशांनी धावू लागल्या. या बससेवेचे तिकीटही अगदी सहा रुपये इतके अल्प ठेवण्यात आले होते. इतर बसच्या तुलनेत दोन रुपये कमी खर्च करून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून नरिमन पॉइंट, रिझव्‍‌र्ह बँक परिसरात जाता येत असल्याने या बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. उद्धव ठाकरेंची लाडकी ‘फोर्ट फेरी’ प्रवाशांचीही लाडकी ठरली.
मात्र १ फेब्रुवारीपासून किमान तिकीट दरात एक रुपयांची दरवाढ करताना ‘बेस्ट’ प्रशासनाने किलोमीटरच्या टप्प्यांमध्ये फेरफार केले. त्यामुळे बसचे तिकीट एक रुपयाने नव्हे तर अनेक ठिकाणी २ ते ४ रुपयांनी वाढले. प्रशासनाच्या या चलाखीतून उद्धव ठाकरे यांची ‘फोर्ट फेरी’ही सुटली नाही. सहा रुपये सरसकट तिकिटाऐवजी आता किमान सात रुपये तिकीट झाले व २ किलोमीटरनंतरच्या टप्प्यासाठी सरसकट १० रुपये तिकीट दर झाला आहे. त्यामुळे ‘फोर्ट फेरी’ने ये-जा करून पूर्वी रोज ४ रुपये वाचवणाऱ्या चाकरमान्यांना आता प्रत्येक फेरीत ४ रुपये याप्रमाणे रोज ८ रुपयांचा भरुदड बसत आहे. ‘फोर्ट फेरी’चे तिकीट दर वाढवताना फार तर दोन रुपये वाढवायला हवे होते. आता इतर बस व फोर्ट फेरीचे तिकीट दर समानच झाले आहेत, अशी नाराजी रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी बोलून दाखवली.