ज्येष्ठ स्वातंत्रसेनानी, साहित्यिक चंद्रकांत पाटगावकर यांचे सोमवारी येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. स्वातंत्र्य चळवळीतील व सामाजिक कार्यातील एक कीर्तिमान पर्व अस्तंगत झाल्याची भावना आज व्यक्त होत होती.    
स्वातंत्र चळवळ, शिक्षण, समाजकार्य, साहित्य, वक्तृत्व अशा विविध क्षेत्रांमध्ये पाटगावकर यांचा गेली सहा दशके अथक वावर होता. १५ जुलै १९२४ रोजी महागाव (ता.गडहिंग्लज) येथे त्यांचा जन्म झाला. विद्यापीठ हायस्कूल, राजाराम कॉलेज येथे त्यांचे शिक्षण झाले. प्राचार्य खर्डेकर यांच्यापासून त्यांना स्वातंत्रलढय़ाची प्रेरणा मिळाली. सेवादलामध्ये कार्यरत असताना त्यांची कुसुमताई परांजपे यांच्याशी ओळख झाली. पुढे १९५१ मध्ये उभयतांचा विवाह झाला.
विद्यापीठ हायस्कूलमध्ये दहा वर्षे इतिहासाचे शिक्षक, त्यानंतर २३ वर्षे राजर्षी शाहू कॉलेजमध्ये हिंदीचे प्राध्यापक व तद्नंतर शिवाजी विद्यापीठात दहा वर्षे स्नातकोत्तर हिंदीचे प्राध्यापक असा त्यांचा शिक्षणक्षेत्रातील प्रवास प्रदीर्घ होता. १९७१ मध्ये त्यांचा स्वातंत्रसैनिक म्हणून सन्मान करण्यात आला. १९७४ मध्ये राज्य शासनाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना देण्यात आला. दिनकर मास्तर पुरस्कारानेही त्यांना दोन वर्षांपूर्वी गौरविण्यात आले होते. शिवाजी विद्यापीठाच्या कार्यकारिणीचे सदस्य, विधी सभेचे सदस्य, राष्ट्रीय सेवादलाचे महामंत्री, सानेगुरुजी व्याख्यानमालेचे उपाध्यक्ष अशा विविध पदांवर ते कार्यरत होते. नेल्सन मंडेला, महात्मा गांधी, शाहू महाराज अशा अनेक विषयांवर त्यांनी चार हजार व्याख्याने दिली होती.प्रकाशयात्री जयप्रकाश नारायण, समतेच्या दिंडीचा वारकरी, राष्ट्रसेवा दल व सानेगुरुजी अशी दहा मराठी व हिंदी भाषेतील पुस्तके त्यांनी लिहिली होती. स्वातंत्र्य सैनिकाचे मिळणारे निवृत्तिवेतन त्यांनी समाजकार्यासाठी खर्च केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran freedom fighter literary chandrakant patgaonkar passed away
First published on: 19-11-2013 at 02:05 IST