आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका बघता स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नांवर सार्वमत घेण्याची गरज व्यक्त करून येणाऱ्या दिवसांत रिपब्लिकन पक्ष स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन करणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्याच्या निमित्ताने रामदास आठवले नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते.
छोटय़ा राज्याच्या निर्मितीसाठी रिपब्लिकन पक्ष नेहमी आग्रही राहिला असून त्यासाठी वेळोवेळी आंदोलन केली आहे. तेलंगणापूर्वी विदर्भाची मागणी होती, मात्र केंद्र सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही. विदर्भावर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे. तेलंगणाचा ठराव संसदेत मांडला जाईल त्याच वेळी स्वतंत्र विदर्भाचा ठराव मांडावा अशी मागणी केली. विदर्भाच्या आंदोलनासंदर्भात जांबुवंतराव धोटे यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. येत्या २१ ऑगस्टला अमरावतीमध्ये विदर्भवादी नेत्यांची आणि कार्यकर्त्यांंची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरविली जाणार आहे. विदर्भाच्या प्रश्नावर जनतेचा पाठिंबा आहे की नाही यासाठी सार्वमत घेण्याची गरज आहे. शिवसेनेचा स्वतंत्र विदर्भाला विरोध असला तरी विदर्भावर अन्याय होत आहे हे शिवसेनेला मान्य आहे. शिवसेनेने विदर्भाला विरोध केला असला तरी महायुतीवर परिणाम होणार नाही. विदर्भाच्या प्रश्नांवर निवडणूक  लढविणे शक्य नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्यांनी विदर्भाच्या प्रश्नावर निवडणूक लढविली होती त्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही, असेही आठवले म्हणाले.
आगामी १० नोव्हेंबरला कस्तुरचंद पार्कवर नागपूर आणि अमरावती विभागाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे. महायुतीमध्ये जागा वाटासंदर्भाचा निर्णय अजून झालेला नाही. शिवसेनेच्या वाटय़ाला २६ आणि भाजपकडे २२ जागा आहेत. दोन्ही पक्षांतील किमान ६ ते ७ जागा आम्हाला मिळाव्यात अशी अपेक्षा असून त्यात रामटेक, लातूर, दक्षिण मध्य मुंबई, कल्याण, पुण्याचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभेच्या जागा निश्चित केल्या तर त्याचा आम्हाला फायदा होईल, असे आठवले यांनी सांगितले.
रिपब्लिकन पक्षाजवळ सक्षम उमेदवार आहे त्यामुळे शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी जागा वाटपाचा निर्णय घेताना रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करावी. राज्यात मोठय़ा प्रमाणात दलित मतदार असून त्यांच्याशिवाय शिवसेना-भाजपचे उमेदवार निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांनी रिपब्लिकन पक्षाचा विचार करावा, असा इशारा त्यांनी दिला आहे.

इंदू मिलची जागा हस्तांतरित करा
इंदू मिलची साडेबारा एकर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला दिल्याची घोषणा केल्यानंतर आठ महिन्यांचा कालावधी लोटला, मात्र अजूनपर्यंत त्याचे प्राधिकरण केले नाही, कामाला प्रारंभ केला नाही. १५ ऑगस्टपूर्वी काम सुरू केले नाही तर १६ ते २२ ऑगस्ट-दरम्यान राज्यात जिल्हा पातळीवर निदर्शने, आंदोलन करण्यात येईल. ६ डिसेंबर २०१३ पूर्वी भूमिपूजन केले नाही तर उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आठवले यांनी दिला. इंदू मिलची जागा दिल्यानंतर तेथील काम सुरू करण्यासाठी वेळकाढू धोरण राबवित आहे असा आरोप रामदास आठवले यांनी केला.