मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत लातूर येथील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास विलासराव देशमुख यांचे नाव देण्याचा ठराव सोमवारी विद्यापीठ कार्य परिषदेत एकमताने मंजूर झाल्याची माहिती पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी दिली. परभणी व बीड येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.आमदार चव्हाण यांच्यासह माधव पवार, सुरेश जेथलिया, जयप्रकाश दांडेगावकर, कुलगुरू डॉ. के. पी. गोरे आदी या बैठकीस उपस्थित होते. चव्हाण यांनी मांडलेल्या या ठरावास आमदार दांडेगावकर यांनी अनुमोदन दिले. परिषदेने तो एकमताने मंजूर केल्याचे जाहीर करण्यात आले. नांदेड व औरंगाबादच्या धर्तीवर नांदेड विद्यापीठांतर्गत परभणीत, तर औरंगाबाद विद्यापीठांतर्गत बीड येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. मराठवाडय़ातील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ही महाविद्यालये गरजेचे असल्याचे चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले.मराठवाडय़ात दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढत आहे. प्रत्येकाला नोकरी देणे शक्य नसल्याने पदवीधरांनी उद्योग-व्यवसायाकडे वळावे. मराठवाडय़ात परभणी, बीड, हिंगोली भागात मोठे उद्योग यायला हवेत. यासाठी सरकारने पुढाकार घेत उद्योगधंद्यांना जमिनी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. उद्योगांसाठी रस्त्यांची सुविधाही निर्माण झाली पाहिजे, असे सांगून मराठवाडय़ातील प्रत्येक जिल्ह्य़ात नोकरी महोत्सव घेतला जाणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. बारावी उत्तीर्ण-अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरावर मुलाखती घेऊन त्यांना विविध नामांकित कंपन्यांत नोकरी दिली जाईल. आठवडय़ातील पाच दिवस काम, दोन दिवस शिक्षण, सोबत मानधन व ४ वर्षांनंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची अभियांत्रिकी विषयाची पदवी दिली जाणार आहे, असे या महोत्सवाचे स्वरूप असल्याचे त्यांनी सांगितले.