विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन (विज्युक्टा) व महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध मागण्यांसाठी विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिक्षण मंडळाच्या प्रात्यक्षिक परीक्षेवरील बहिष्कारावर विज्युक्टा ठाम असल्याचे विज्युक्टाचे महासचिव प्रा. अशोक गव्हाणकर यांनी सभेत सांगितले.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने गेल्या १७ डिसेंबरला विधानभवनावर मार्चा काढून आंदोलनाला सुरुवात केली. शासनाने संघटनेला वेळोवेळी दिलेली आश्वासने न पाळल्याने शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. नागपूर विभागातील सहाही जिल्ह्य़ांतील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी यशवंत स्टेडियमवरून काढलेला मोर्चा शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयावर धडकला. शिक्षण मंडळाच्या २ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेवरील बहिष्कार कायम असून हा लढा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचवायचा आहे, असे  प्रा. गव्हाणकर यांनी म्हणाले.
आमदार नागो गाणार व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन विभागीय शिक्षण उपसंचालकांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक परिषदेचा या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे आमदार गाणार यांनी जाहीर केले. मोर्चासाठी विज्युक्टाचे महासचिव प्रा. युगल रायलू, शहर अध्यक्ष प्रा. अशोक डोफे, सचिव प्रा. ज्ञानेश्वर डोंगरे, प्रा. नामदेव घोळसे आदींनी सहकार्य केले.