संपूर्ण जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या ११ जागांसाठी मंगळवारी मतदान होत आहे. या निवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून जिल्ह्य़ातील ३२ केंद्रांवर कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक  केंद्रांवर पोलीस उपनिरीक्षकांसह सहा सुरक्षा कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. दरम्यान, बँकेच्या २१ पैकी १० जागा अविरोध निवडून आल्याने राखीव सहा जागांसाठी हिरे, ढिकले आणि शेतकरी विकास पॅनलमध्ये तिरंगी लढत होत असून गुरुवारी मतमोजणी होणार आहे.
सर्व उमेदवारांकडून सभासदांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू होते. बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ पैकी १० जागा याआधीच अविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित ११ जागांसाठी ४१ उमेदवार िरगणात आहेत. त्यामध्ये अ गटाच्या पाच, तर राखीव गटाच्या सहा जागा आहेत. या निवडणुकीसाठी प्रत्येक तालुक्याच्या (१५) याप्रमाणे नाशिक व मालेगावला, तर उर्वरीत दोन ठिकाणी मुख्यालयी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सतीश खरे काम पाहत आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अपूर्व व अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखाली सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब हिरे पॅनल, माजी आमदार माणिकराव कोकाटे व माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल, सुनील ढिकले आणि आ. अनिल कदम यांच्या नेतृत्वाखालील सहकारमहर्षी स्व. उत्तमराव ढिकले पॅनल अशा तिन्ही पॅनलमध्ये सहा राखीव जागांवर तिरंगी लढत होत आहे. त्यात तिन्ही पॅनलचे १८ आणि अपक्ष १३ असे एकूण ३१ उमेदवार रिंगणात आहेत. तर अ गटातील कळवण, नांदगाव, नाशिक, सिन्नर आणि निफाड या पाच जागांसाठी सरळ लढत होत आहे.