शहरावर कोसळलेले पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस भीषण स्वरूप धारण करीत असून अनेक भागांत नळाचे पाणी सुमारे २५ दिवसांपासून बंद झाले आहे. त्यामुळे सध्या टँकर्स, कुपनलिका व विहिरी हाच पाणी पुरवठय़ाचा एकमेव आधार आहे. खासगी टँकर्स व ‘मिनरल वॉटर’ व्यावसायिकांची चांदी झाली असून विहिरी व कुपनलिकांमधील पाणी विक्री करणारा एक नवा वर्ग उदयास आला आहे. अनेक बोअर व विहिरी आटत चालल्या असताना बोअर करून देणाऱ्यांचा व्यवसाय चांगलाच भरास आहे. परंतु, जलस्त्रोत पूर्णपणे आटल्याने ३०० फूटावर पाणी लागत नसून ९० टक्के बोअर अपयशी ठरत आहेत.
शहरात सध्या शासन व सेवाभावी संस्थांमार्फत टँकर्स व ट्रॅक्टरद्वारे पालिकेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. या टँकरवर पाणी भरण्यासाठी उसळणाऱ्या गर्दीमुळे दररोज वादाचे प्रसंग घडत आहेत. यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील महिला टँकरमधील पाणी भरण्यासाठी जात नसल्याचे दिसून येते. एवढय़ा गर्दीत पाणी भरण्यासाठी जाण्याचे धाडसही महिलांना होत नाही. त्यामुळे खासगी पाणी पुरवठय़ाचा आधार घेणे भाग पडले आहे. पिण्याच्या घरगुती गरजेपासून तर बांधकाम, शेती, विवाहकार्य, हॉटेल, लॉजिंग, ढाबे, उपहारगृहे आदी ठिकाणी व वेगवेगळ्या कारणांसाठी खासगी टँकर्सला मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे टँकर्स असणारा व्यापारी वर्ग खासगी पाणी पुरवठा करणाऱ्या व्यवसायाकडे मोठय़ा प्रमाणात वळला आहे. त्यात शेतकरी, विहिरधारक, कुपनलिकाधारक, सप्लायर आदींचा समावेश आहे. ज्यांच्या विहिरी व कुपनलिकांना चांगले पाणी आहे, त्यांचाही पाणी भरून देणारा एक वर्ग तयार झाला आहे. दोनशे ते चारशे रूपये प्रति टँकर पाणी विकत घेऊन त्याची किमान सहाशे ते आठशे रूपयांपर्यंत विक्री केली जात आहे. शहरातील अनेक भागात वापरण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने अनेक उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांकडून ८०० ते १००० रूपये देवून दर चार ते पाच दिवसाला एक टँकर मागविला जात आहे. त्यामुळे पाणी विक्री करणारे व टँकरचालकांसाठी ही पाणी टंचाई सुवर्णसंधी ठरली आहे. खासगी टँकरमार्फत पाणी पुरविणाऱ्या टँकरला सुगीचे दिवस आले आहेत. नवीन टँकर्स निर्मिती करणाऱ्या वर्कशॉप चालकांची मागणीनुसार टँकर तयार करून देताना दमछाक होत आहे. दुसरीकडे मिनरल वॉटरचा धंदाही जोरात असून पाण्याच्या २० लिटरच्या जारची घरपोच देण्याची सेवाही सुरू झाली आहे.
पिण्याचे शुद्ध र्निजतूक व स्वच्छ पाणी दूरध्वनी केल्यानंतर घरपोहोच मिळते किंवा दररोज घरी आणून दिले जाते. यामुळे अनेकांनी त्या सेवेला पसंदी दिली आहे. २० लिटरच्या या जारसाठी नागरिकांना ५५ ते ६० रूपये मोजावे लागत आहे.
खास बाब म्हणून शासनाने हस्तक्षेप करावा
ओझरखेड डाव्या कालव्यातून निफाड व दिंडोरीसाठी २२० दशलक्ष घनफूट पाणी रोटेशनद्वारे खास बाब म्हणून सोडण्यास राज्य शासनाने गेल्या सप्ताहातच मंजुरी दिली. आ. धनराज दायमा व आ. अनिल कदम यांच्या आंदोलनाच्या रेटय़ामुळे शासनाने पाण्याची गळती व चोरी रोखण्यासाठी कालव्याभोवती पोलीस बंदोबस्त तैनात करत या काळात वीज पुरवठा खंडीत करण्याच्या अटीवर हे रोटेशन सोडण्यात येणार आहे. याच धर्तीवर मनमाड शहरावरील भीषण संकट लक्षात घेता खास बाब म्हणून मनमाड शहरासाठी राखीव असलेला पालखेड धरणातील साठा रोटेशनद्वारे किमान १५ दिवस आधी सोडण्यात यावा, अशी स्थानिकांची मागणी आहे.
महिनाभराचा द्राविडी प्राणायाम
मनमाडकारांनी रोटेशनचे पाणी एक महिना आधीच संपवून टाकले, आता १५ मार्चपूर्वी नव्या रोटेशनचे पाणी देता येणे शक्य नाही. ते दिल्यास पुढे प्यायला पाणी उरणार नाही, अशी भूमिका पालकमंत्री छगन भूजबळ यांनी घेतली. आ. पंकज भुजबळ यांच्यासह जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाने त्यांचीच री ओढल्याने यापुढे टँकर्स, कुपनलिका, विहिरी हाच एकमेव पर्यायाचा आधार किमान महिनाभर राहणार आहे. पालिकेचे स्वत:चे सात, सेवाभावी व्यक्ती व संस्थांचे सात तर राज्य शासनातर्फे विभागीय महसूल आयुक्तांनी नव्याने मंजूर केलेल्या प्रत्येकी १२ हजार लिटर क्षमतेचे एकूण ३० टँकरमधून शहराला नाग्यासाक्या धरणातून दररोज पाणी पुरवठा केला जात असल्याचे मुख्याधिकारी संजय केदार यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

More Stories onमनमाडManmad
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water problem is become more dark in manmad
First published on: 21-02-2013 at 03:55 IST