पूर्णा तालुक्यातील आजदापूर येथील ५० लाख व धानोरा काळे येथील १ कोटी ३८ लाख खर्चाच्या पाणीयोजनेच्या प्रस्तावास राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली.
आजदापूर योजनेच्या प्रस्तावास ग्रामपंचायतीने ठराव क्रमांक १२ नुसार ३० ऑक्टोबर २००० रोजी मान्यता दिली. योजनेचा दरडोई खर्च वाढल्यामुळे हा प्रस्ताव जि. प.ने सरकारच्या मान्यतेसाठी सादर केला. प्रस्तावानुसार ३२३२ रुपये वाढीव दरडोई खर्च गृहीत धरून ४९ लाख ५९ हजार १३० रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
धानोरा काळे येथील योजनेचा प्रस्ताव दरडोई खर्च वाढल्यामुळे जि. प.ने सरकारकडे सादर केला होता. या योजनेसाठीही ३१२६ रुपये वाढीव दरडोई खर्च गृहीत धरून १ कोटी ३७ लाख ८२ हजार १०० रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. ग्रामपंचायत किंवा ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती यांनी योजनेची अंमलबजावणी करावी, असे निर्देश दिले आहेत. योजना पूर्ण झाल्यावर देखभाल, दुरूस्तीचे काम ग्रामपंचायत, तसेच ग्राम पाणीपुरवठा समितीकडे सोपविले आहे. लोकवर्गणी प्राप्त झाल्यानंतरच योजनेचे काम सुरू होईल. देखभाल दुरूस्तीसाठी सरकारकडून कुठलेही अनुदान मिळणार नाही, अशा अटी घातल्या आहेत. योजनेवरील खर्च जि. प.ला प्राप्त होणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मिळणाऱ्या निधीतून भागवावा, असे आदेशात नमूद केले आहे.