ठाणे शहरातील नागरिकांना गेल्या आठवडाभर पाणीटंचाईला सामोरे जावे लागल्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी शुक्रवारी २४ तास पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने अध्र्याहून अधिक ठाण्याला पुन्हा एकदा ‘पाणी बंद’ला सामोरे जावे लागणार आहे. कोलशेत, बाळकुम, वागळे इस्टेट, कळवा, विटावा, खारेगाव, बेलापूर रोड भागातील रहिवाशांना २९ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ पासून ३० नोव्हेंबपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरदेखील पुढील एक ते दोन दिवस या भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे सलग चार दिवस ठाणेकरांचे हाल होणार आहेत. या परिसरात औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी घेऊन महापालिकेमार्फत पुरविले जाते. सलग दुसऱ्या आठवडय़ात पाणीपुरवठा खंडित होत असल्यामुळे या भागातील रहिवाशांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.  
ठाणे महापालिका एमआयडीसी, स्टेम तसेच स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून पाणी घेऊन शहरातील वेगवेगळ्या भागात पुरवठा करते. दोन आठवडय़ांपासून महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतील पाणीपुरवठा यंत्रणेचे काम सुरू असल्याने तब्बल दोन दिवस पाणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतरही शहरातील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे ठाणेकर हैराण झाले होते. हे काम पूर्ण होऊन ठाण्यातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आता कुठे महापालिकेस यश आले आहे. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ‘शट डाऊन’ घेण्यात आल्याने पुन्हा एकदा पाणीपुरवठा बंद ठेवण्याची नामुष्की पाणीपुरवठा विभागावर ओढवली आहे.