४२ गावे आणि ११० पाडय़ांना टँकरने पाणी पुरवठा
ठाणे जिल्ह्य़ातील ४२ गावे तसेच ११० पाडय़ांमध्ये तीव्र पाणी टंचाईची समस्या जाणवत असून या गावांमध्ये ३२ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती सोमवारी एका विशेष बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादर केली. मात्र, दोन ते तीन दिवसाने होणाऱ्या टँकरच्या फेऱ्यांमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. त्यामुळे या गावांना पाणी टंचाईची समस्या जाणवू नये, यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आदेश पालकमंत्री गणेश नाईक यांनी या वेळी दिले.
ठाणे जिल्ह्य़ातील पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी सोमवारी एक विशेष बैठक घेण्यात आली. त्या वेळी आमदार, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी तसेच सदस्य, आदी उपस्थित होते. जिल्ह्य़ातील १५ तालुक्यांपैकी शहापूर, मोखाडा, विक्रमगड, जव्हार आणि मुरबाड या पाच तालुक्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. त्यामध्ये शहापुरातील ११ गावे व ६३ पाडे, मोखाडय़ातील १९ गावे व २३ पाडे, विक्रमगडमधील तीन गावे व दहा पाडे, जव्हारमधील सात गावे व सहा पाडे आणि मुरबाडमधील दोन गावे व आठ पाडय़ांचा समावेश असून या सर्व गाव व पाडय़ांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली. पाणी टंचाईसाठी सात कोटी ८१ लाख ४५ हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा आणि नळ योजना व विहिरींच्या कामाचा समावेश आहे.
जिल्ह्य़ातील पाणी टंचाईचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री गणेश नाईक यांनी संबंधित विभागाकडून एक अहवाल मागितला आहे. त्यामध्ये पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये कोणत्या उपाययोजनांची आवश्यकता आहे. बंद नळ योजना सुरू करण्यासाठी किती खर्च येईल, त्यावर कोणत्या योजनेतून खर्च करता येईल. तसेच महावितरणची थकबाकी, अशी सविस्तर माहिती देण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.
बांधकामांना परवानगी देऊ नका -नाईक
पाणी टंचाई असतानाही जिल्ह्य़ातील शहरी भागात बांधकामे सुरू असल्याचा मुद्दा काही आमदारांनी या बैठकीत उपस्थित केला. त्यावर पाणी टंचाई असलेल्या शहरात बांधकामांसाठी परवानगी देण्यात येऊ नये, असे आदेशच पालकमंत्री गणेश नाईक यांनी महापालिकांना या वेळी दिले.