शहराला होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तीन दिवसाआड करण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. शहराला कठोरा येथून तापी नदीमधून पाणी पुरवठा केला जातो. नदीत सध्या पाणी नसल्याने डोहात असलेल्या पाण्याचा महिनाभर वापर होऊ शकेल. त्यामुळे नदीपात्राची नगराध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, उपनगराध्यक्ष विकास पाटील, डॉ. महेंद्र पाटील, रवी मराठे, एस. बी. पाटील आदींनी पाहणी करून शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. तसेच शहराला गूळ नदी धरणातून पाणी आवर्तन मिळाल्याने नियोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे. कूपनलिकांचाही वापर केला जाणार आहे. हतनूर कालवा, अनेर धरणातील पाण्याचा फुगवटा व गूळ प्रकल्पातील सिंचनासाठी असलेले पाणी पिण्यासाठी आरक्षित झाले आहे. पाणी असूनही कृषी सिंचनाला मिळत नाही. अनेक भागांत कूपनलिका बंद पडल्या किंवा त्यांची पाणी क्षमता घटली आहे. टंचाईला विद्युत भारनियमनाची साथ मिळत असल्याने गहू, हरभरा, मका या उन्हाळी पिकांचे भवितव्य अंधारात आहे. केळी व ऊस ही बागायती पिकेही अडचणीत आली आहेत. शेतीची अशी अवस्था असल्याने शेतीतून फारसे काही लागण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणितच कोलमडणार आहे. पुढील पावसाळा येईपर्यंत अद्याप सहा महिने बाकी असल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट अधिकच गहिरे होणार आहे. प्रशासनापुढेही पुढील काळ त्यांच्या निर्णय क्षमतेची कसोटी पाहणारा ठरणार आहे. कारण शेतीपेक्षा पिण्यासाठी पाणी आणणे अधिक जिकिरीचे ठरणार आहे. भविष्यात टंचाईचे संकट अधिकच घोंघावणार असल्याने प्रशासनाने आतापासूनच पुढील नियोजनास सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply after three days in chopda
First published on: 25-12-2012 at 01:45 IST