लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बालेकिल्ल्याची नव्या जोमाने डागडुजी सुरू केली असली तरी स्थानिक पातळीवरील मौनी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांबद्दलची त्यांची अस्वस्थता मात्र कायम आहे. राज यांच्या दौऱ्यात पुन्हा त्याचे प्रत्यंतर आले. विकास कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली जात नसल्याने वैतागून राज यांनी ही परिस्थिती ‘सायलेंट मुव्ही’ काढल्यामुळे झाली असल्याचे नमूद करत स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांवरील रोष प्रगट केला. त्यानंतर मनसेच्या या मूकपटातील कलाकार आहेत तरी कोण,
या विषयी कार्यकर्त्यांमध्येच चर्चा रंगली आहे. त्यात प्रमुख जबाबदारी ज्यांच्यावर येते, त्यांच्याविषयी थोडक्यात..

महापौर अ‍ॅड. यतिन वाघ
पेशाने वकील. म्हणजे किमान पक्षकारासाठी तरी न्यायालयात लढण्याचा अर्थात बोलण्याचा अनुभव गाठिशी असणारी व्यक्ती. महापौरपदी निवड करताना या निकषाचाही थोडाबहुत विचार झाला असणार. पण, राज यांचा महापौरांकडून सर्वाधिक भ्रमनिरास झाल्याचे सांगितले जाते. राज यांच्या मूकपटातील प्रमुख भूमिकेत अ‍ॅड. वाघ असल्याचे सर्वाचे म्हणणे आहे. शांत व अबोल अशी त्यांची प्रतिमा. महापालिकेने विकास कामे करूनही ती जनतेसमोर मांडण्यात ते कमी पडले. खुद्द या मूकपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या राज यांच्याकडूनही वारंवार सूचना देत त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आता महापौरांकडून थोडीफार संवादफेक होऊ लागली आहे.

आ. वसंत गिते
नाशिकला मनसेचा बालेकिल्ला बनविण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावणारे हे नेते. दांडगा जनसंपर्क आणि संघटन कौशल्यामुळे ते आमदार म्हणून लिलया निवडून आले. सर्वाना सांभाळून घेण्याबरोबर बोलण्याचे कसबही त्यांच्या ठायी आहे. राज्याचे प्रदेश सरचिटणीसपद भूषविणारे गीते स्थानिक पातळीवरील प्रमुख नेते. स्थानिक पातळीवर कोणताही निर्णय त्यांची भूमिका जाणून घेतल्याशिवाय होत नाही. शहरवासीयांनी त्यांना विधानसभेत पाठविले असले तरी महापालिकेशीही ते संबंधित असल्याने पालिकेच्या कामकाजावरही प्रभाव टाकण्याची त्यांची शैली असल्याची, खुद्द पक्षातील काही जणांची भावना. शहराच्या विकासासाठी हा हस्तक्षेप असेल तर तो योग्यही मानता येईल. पण, जी विकास कामे महापालिकेमार्फत केली जात आहेत, ती शहरवासीयांसमोर मांडण्यात ते देखील कमीच पडले, असे राज यांचे निरीक्षण असावे.

आ. उत्तम ढिकले
नगराध्यक्ष, महापौर, खासदार आणि आमदार अशी अनेक महत्वपूर्ण पदे भूषविणारे आ. उत्तम ढिकले हे पक्षाचे स्थानिक पातळीवर नव्हे तर, राज्य पातळीवरील ज्येष्ठ नेते. कायद्याचे पदवीधर असणारे आ. ढिकले यांचे वकृत्व कौशल्य चांगले आहे. प्रत्येक विषयावर अभ्यास करून काय बोलावे आणि काय बोलू नये, याचा त्यांना प्रचंड अनुभव आहे. तथापि, ते देखील पक्षाची विकास कामे जनतेपर्यंत नेऊ शकले नाहीत, असे राज यांचे विधान दर्शविते. पण, त्याची कारणेही तशीच आहेत. स्थानिक पातळीवरील पक्षाची नेते मंडळी त्यांना महापालिकेपासून दूर ठेवते. म्हणजे, लक्ष घालू देत नाही. त्यांना लक्षच घालू दिले नाही तर ते विकास कामांची काय माहिती सांगणार, असा प्रश्न त्यांचे समर्थक उपस्थित करतात.

आ. नितीन भोसले
शहरातील हे मनसेचे तिसरे आमदार. महापालिकेत सेना-भाजपची सत्ता असताना पालिकेच्या वादग्रस्त कारभाराशी संबंधित अनेक प्रश्न विधानसभेत मांडणाऱ्या भोसले यांनी ही सत्ता मनसेच्या ताब्यात आल्यानंतर अचानक विश्रांती घेतली. विधानसभा अधिवेशनात अभ्यासुपणे प्रश्न मांडणाऱ्या भोसले यांनी शहरातील मनसेच्या कामाबाबत मौनच पत्करल्याचे दिसते. याआधी शहराध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. पण, ते नावालाच. कारण आ. गीते सर्व निर्णय परस्पर घेत असल्याची भोसले गटाची खदखद होती. गीते व भोसले गटात विस्तवही जात नाही. महापालिकेच्या कारभारात आ. गीतेंनी रस घेतल्याने भोसले यांनी तिथून लक्ष काढून घेणे स्वाभाविकच. परिणामी आपले चांगले वकृत्व त्यांनी विकास कामांच्या जनजागृतीसाठी खर्ची पाडले नाही. त्यामुळे ते देखील मूकपटातील एक भाग बनले.