स्वत: आर्थिक अडचणीत आलेल्या महापालिकेने कर्मचाऱ्यांच्या कर्जाचे त्यांच्या वेतनातून कपात केलेले हप्ते जमा न करून महापालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेलाही अडचणीत आणले आहे. पतसंस्थेचे तब्बल ३ कोटी ३४ लाख १ हजार ५८१ रूपये मनपाने थकवले असून हे पैसे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वसूल केले असे दाखवले आहे हे विशेष!
पतसंस्थेचे सर्व सभासद मनपाचे कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांनी पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते मनपा त्यांच्या वेतनातून परस्पर कपात करून घेत असते व नंतर ते पैसे पतसंस्थेकडे जमा करते. कर्मचारी युनियनबरोबर झालेल्या करारान्वयेच हे केले जाते. कर्मचाऱ्यांचीही त्याला काही हरकत नाही व पतसंस्थेला त्यांनी दिलेल्या कर्जाचे हप्ते व्यवस्थित मिळत असल्यामुळे पतसंस्थेचे त्याबाबतीत कधी आक्षेप घेत नाही. गेली अनेक वर्षे असेच सुरू आहे.
मात्र मागील काही वर्षे मनपा आर्थिक अडचणीत आलेली आहे. त्यामुळे यात अनियमितता येत आहे. त्याचा तोटा पतसंस्थेला सहन करावा लागत आहे. पतसंस्था जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कॅश क्रेडीट कर्ज घेत असते. मनपाकडून हप्ते जमा झाले की त्यातून हे कर्ज फेडले जाते. हप्ते जमा झाले तरच हा व्यवहार सुरळीत होतो. आता त्यात अनियमितता आल्यामुळे पतसंस्थेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला त्यांच्या कॅश क्रेडीट कर्जाचे दरमहा २० ते २२ लाख रूपये व्याज द्यावे लागत आहे. गेल्या काही महिन्यात तेही देता न आल्याने जिल्हा बँक त्या व्याजावर व्याज लावत आहे.
पतसंस्था त्यामुळे आर्थिक अडचणीत आली असून त्यांच्याकडे आता सभासदांना कर्ज द्यायला पैसेच शिल्लक नाहीत. त्याचबरोबर संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन निघणेही अवघड झाले आहे. आता आर्थिक वर्ष संपत आल्यामुळे सभासदांना त्यांच्या ठेवीवर व्याज तसेच लाभांशही द्यावा लागणार आहे. पैसेच शिल्लक नसल्याने तो कशातून अदा करायचा असा प्रश्न संस्थेसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे पतसंस्थेचे अध्यक्ष कैलास भोसले, उपाध्यक्ष विलास सोनटक्के यांनी मनपा आयुक्त, उपायुक्त, महापौर तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मनपाच्या या आर्थिक अनियमतेतेमुळे पतसंस्था डबघाईला आली असून संस्थेची ३ नोव्हेंबर २०१२ ते मार्च २०१३ पर्यंत मनपाकडे असलेली थकबाकी ३ कोटी ३४ लाख १ हजार ५८१ रूपये त्वरीत अदा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पैसे आल्यावर भरू…’
जकात बंद, स्थानिक संस्था करातून अपेक्षित उत्पन्न नाही, मालमत्ता कराची वसुली नाही यामुळे मनपालाच सध्या कर्मचाऱ्यांना नियमीत वेतन देणे अवघड झाले आहे. याची फार ओरड होऊ नये यासाठी मनपा कर्मचाऱ्यांना त्यांचे पतसंस्थेतील कर्जाचे हप्ते, भविष्य निर्वाह निधी तसेच एलआयसी वगैरेचे हप्ते कपात करून जेवढी रक्कम शिल्लक राहील तेवढेच वेतन करते. त्यात कपात केलेले पैसे दाखवण्यात येतात, प्रत्यक्षात मात्र मनपाकडे ते नाहीतच, त्यामुळेच जमा करणे अवघड झाले आहे. पैसे आले की ते त्यात्या खात्यात जमा करण्यात येतील असे मनपाच्या अकौंट विभागाकडून सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Workers credit society in trouble due to mnc
First published on: 23-03-2013 at 01:04 IST