आसामची नाटय़परंपरा फार मोठी आहे. संतच मानले जाणारे शंकरदेव (१४४९- १५६८) यांनी ‘अंकीय नाट’ आणि ‘भाओना’ हे अभिनयाधारित रसनिर्मितीचे प्रकार रूढ केले. परंपरागत फिरते नाटय़चमू (‘भ्रम्यमान’) हाही आसाममध्ये १९२० च्या दशकापर्यंत चांगलाच स्थिरावलेला प्रकार होता. मात्र आधुनिकतेचे वारे या परंपरांना लागले नव्हते. ते लागले, याचे एक मोठे कारण म्हणजे अच्युत लहकार!

अच्युत यांचे वडील ‘भ्रम्यमान’ पद्धतीच्या नाटय़चमूचा कपडेपट सांभाळत असत. पोशाख स्वत: शिवतही असत. अच्युत यांचा जन्म १९३१चा. मॅट्रिक होऊन ते कोलकात्यास गेले आणि शिकून लेखक होण्याची स्वप्ने पाहू लागले. ‘दीपावली’ या कोलकात्याच्या मासिकात नोकरीही करू लागले. पण गावाकडे, बारपेटा जिल्ह्यात असलेला भाऊ सदा याचे लक्षण ठीक नव्हते. त्याला घेऊनच अच्युत कोलकात्यास आले आणि पुढे याच दोघांनी फिरत्या नाटय़चमूत कामे करून धमाल उडविली. अखेर १९६३ सालच्या गांधी जयंतीला आसामच्या नाटय़ेतिहासात ती क्रांतिकारक घटना घडली. या लहकार बंधूंनी ‘नटराज थिएटर’ स्थापून, भ्रम्यमान नाटय़कलेला घर दिले. सर्कशीसारख्या तंबूत, जनरेटरच्या विजेवर नाटके सुरू झाली. हा टप्पा क्रांतीसारखाच, कारण तोवर लोकांच्या मागणीबरहुकूम नाटके गावोगावी जात. आता मागणी तयार करण्याचे आव्हान आले. त्यासाठी नवे विषय शोधणे, अभिनयापासून नेपथ्यापर्यंतचा दर्जा राखणेही आले.

हैदर अली, टिकेंदरजीत, जेरेंगर सती अशी चरित्रआख्यानासारखी नाटके अगदी सुरुवातीला अच्युत यांनीही लिहिली, दिग्दर्शित केली. पण पुढल्या दहाच वर्षांत ‘अजेय व्हिएतनाम’सारखे विषयसुद्धा त्यांच्या रंगमंचावर आले. दौरे आणि एकाच जागी खेळ यांचा मेळ त्यांनी घातला. दर तिमाहीत एक तरी नवे नाटक मंचित होत असे- म्हणजे ते नव्याने लिहिलेही जात असे! ‘ले., दि., प्र. भू.’ अर्थात अच्युत लहकार. क्वचित ही नाटके एखाद्या इंग्रजी चित्रपटाच्या कथानकावर बेतलेली असत, पण आसामी भाषा-संस्कृतीचा जिवंत अनुभव त्यात असे. अलीकडल्या ‘टायटॅनिक’ या हॉलीवूडपटानंतर लहकार यांनी केलेले त्याच नावाचे, त्याच कथेचे नाटक लोकप्रिय ठरले, तेही याच जिवंतपणामुळे. तीसहून अधिक नाटय़चमू आजघडीला ‘भ्रम्यमान’ पद्धतीने प्रयोग लावतात. बारपेटा जिल्ह्यातील ‘नटराज थिएटर’मध्ये या सर्वच नाटय़चमूंचे प्रयोग गेली अनेक वर्षे होतात. लोककलेपासून आधुनिकतेकडे गेलेला, पण लोकांशी नाते टिकवलेला असा हा जनप्रिय नाटय़प्रकार रुजवण्याचे श्रेय निर्विवादपणे अच्युत यांचे आहे. त्यांना हयातीत कधी आसामबाहेरचे पुरस्कार मिळाले नाहीत, ही मात्र मोठी खंत असे. आसामातूनच दिला जाणारा, परंतु राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा ‘कमलादेवी पुरस्कार’ त्यांना १९९७ साली मिळाला होता.