News Flash

अनिरूद जगनॉथ

मॉरिशसच्या राजकारणात ते १९६३ पासून सक्रिय होते

मॉरिशस हा आकाराने गोव्याहून लहान आणि ठाणे शहराहून कमी लोकसंख्येचा देश, पण त्याला जगात काहीएक स्थान मिळवून देणाऱ्यांत तेथील पंतप्रधान व अध्यक्ष ही दोन्ही पदे भूषवलेले अनिरूद जगनॉथ यांचा वाटा मोठा होता. भारतीय वंशाचे म्हणून भारतीयांना अगत्य असलेल्या या राजकीय नेत्याचे निधन गेल्या मंगळवारी, ३ जून रोजी झाले व त्यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मॉरिशसच्या राजकारणात ते १९६३ पासून सक्रिय होते; त्यास अपवाद केवळ १९६७ ते १९७० यांमधील अडीच वर्षांचा- तेव्हा स्वत:चा ‘ऑल मॉरिशस हिंदू काँग्रेस’ हा पक्ष विसर्जित करून त्यांनी नागरी सेवेत, सत्र न्यायाधीश हे पद स्वीकारले होते. अर्थात, पुढे ‘मिलिटंट सोशालिस्ट मूव्हमेंट’ या पक्षात ते सर्वाधिक काळ (१९८३-२००३) होते. २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात (द हेग येथे) ‘चागोस बेटे मॉरिशसचीच’ हा दावा मांडताना त्यांना न्यायालयीन कारकीर्दीचा उपयोगही झाला. चागोस बेटांवरील मॉरिशसचा हक्क आता मान्य होण्याचे श्रेय जगनॉथ यांना जाते.

पण त्याहीआधी, मॉरिशसची स्वातंत्र्याकडे वाटचाल होत असताना आणि राज्यघटना साकारत असताना ते राजकारणात खासदार वा मंत्रिपदावर होते. १९९२ मध्ये मॉरिशस प्रजासत्ताक झाले, १९९५ मध्ये जगनॉथ यांना पंतप्रधानपद मिळाले. जागतिकीकरणाच्या त्या काळात मॉरिशसची आर्थिक प्रगती झपाटय़ाने झाली, याचेही श्रेय अनिरूद जगनॉथ यांना दिले जाते.

मॉरिशसमधील सुमारे ६७ टक्के लोक भारतीय वंशाचे. पण किमान तीन पिढय़ा त्याच देशात गेलेले. तेथील सर्वोच्च सत्तापदे प्रामुख्याने रामगुलाम (पिता सिवसागॉर, पुत्र नवीन- जे विद्यमान पंतप्रधान आहेत) तसेच जगनॉथ (अनिरूद आणि पुत्र प्रविन्द) या घराण्यांमध्ये राहिली. या प्रविन्द यांच्यावर २०११ मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तेव्हा अनिरूद मॉरिशसच्या अध्यक्षपदी होते. तर २०१७ मध्ये, पुन्हा स्वत:ला मिळालेले पंतप्रधानपद अनिरूद यांनी या पुत्राला दिल्यामुळे वादंग उठला होता. हे असे राजकारण मॉरिशसला ‘नवीन’ नाही. परंतु जगनॉथ घराण्याला उतरती कळा लावणाऱ्या त्या घडामोडींनंतरही, २०२० मध्ये ‘पद्मविभूषण’ या किताबाने गौरविण्यात आल्यामुळे अनिरूद जगनॉथ यांची आदरणीयता तसूभरही कमी झालेली नसल्याचेच सिद्ध झाले. त्याआधी त्यांना इंग्लंडच्या राणीकडून उमरावकीसदृश किताब मिळाला होता. फ्रान्सचाही प्रभाव मॉरिशसवर असून त्याही देशाच्या सन्मानास ते पात्र ठरले होते. अनिरूद यांच्या निधनाने, मॉरिशसला आर्थिक प्रगतीच्या वाटेवर नेतानाच त्या देशाच्या अस्मितेला टोकदार करणारा नेता हरपला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 1:43 am

Web Title: anerood jugnauth former president of mauritius zws 70
Next Stories
1 लक्ष्मीनंदन बोरा
2 डॉ. जेन गुडाल
3 युआन लाँगपिंग
Just Now!
X