आपण रोज ज्या वस्तू वापरतो त्या पदार्थाचे गुणधर्म फार महत्त्वाचे असतात. म्हणजे तन्यता असेल तर त्या धातूची तार तयार करता येते हे त्याचे एक उदाहरण. अलीक डच्या काळात नवप्रवर्तनासाठी या विशिष्ट गुणधर्म असलेल्या पदार्थाचा शोध घेणे फार महत्त्वाचे आहे. या शाखेत संशोधन करणारे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेसचे वैज्ञानिक यू राममूर्ती यांना यंदाचा थर्ड वर्ल्ड सायन्स अॅकॅडमी पुरस्कार जाहीर झाला आहे. १५ हजार डॉलरचा हा पुरस्कार त्यांना अभियांत्रिकी शाखेतील संशोधनासाठी मिळाला असला तरी त्यांचे नॅनो तंत्रज्ञानातील संशोधनही मोठे आहे. किंबहुना नॅनो तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच नवीन गुणधर्म असलेले पदार्थ तयार करण्याची संधी वैज्ञानिकांना प्राप्त झाली आहे.
राममूर्ती यांचे वैशिष्टय़ म्हणजे परदेशात त्यांना भरपूर वेतनाची नोकरी मिळू शकली असती किंवा तेथे ते संशोधनही करू शकले असते, पण त्यांनी मायदेशात संशोधन करणे पसंत केले आहे. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्य़ात भीमावरम येथे १९६७ मध्ये झाला. सध्या ते इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेत प्राध्यापक आहेत. आंध्र विद्यापीठातून त्यांनी अभियांत्रिकीत पदवी घेतली. नंतर ते इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेतून अभियांत्रिकीत पदव्युत्तर स्नातक बनले.
१९८४ मध्ये त्यांनी ब्राऊन विद्यापीठातून पीएचडी पदवी घेतली. त्यांना २०११ मध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्कारही मिळाला आहे. चीन, कोरिया, ब्राझील यांसारख्या देशांच्या वैज्ञानिकांशी स्पर्धा करीत त्यांना आताचा पुरस्कार मिळाला आहे. मॅसॅच्युसेटस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या अमेरिकेतील संस्थेची ख्याती अशी आहे की, तेथील किमान डझनाहून अधिक वैज्ञानिकांना नोबेल मिळालेले आहे. त्या संस्थेत संधी मिळत असतानाही राममूर्ती यांनी भारतात येऊन संशोधन केले ही देशप्रेमाची खरी साक्ष होती.
थर्ड वर्ल्ड सायन्स अॅकॅडमी पुरस्कार हा युनेस्कोच्या आर्थिक सहकार्यातून कृषी विज्ञान, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, पृथ्वी विज्ञान, अभियांत्रिकी, गणित, वैद्यक, भौतिकशास्त्र या शाखांमध्ये दिला जातो, त्यासाठी एक महत्त्वाची अट म्हणजे त्या व्यक्तीचे वास्तव्य किमान दहा वर्षे विकसनशील देशात असावे लागते. राममूर्ती यांनी पदार्थामध्ये कालांतराने होणारे बदल, फरक यावर संशोधन केले आहे. मेटॅलिक ग्लास, नॅनो इंडेन्टेशन तंत्र, मॅग्नेशियम, टिटॅनियम यांची संमिश्रे, कार्बनी स्फटिक यावरही त्यांनी मोठे काम केले आहे.