‘तीस्ता नदीवरले धरण (बराज) बांधून पूर्ण झाले. धरण होण्यापूर्वी मुक्त, अवखळपणे वाहणारी ती नदी आता मृतप्राय झाली. उरले, ते तीस्तेचे कलेवर’ – हे सांगणारा संवाद देबेश राय यांना सुचला तो १९८९ मध्ये.. ‘तीस्ता पारेर बृत्तान्तो’ या कादंबरीच्या अखेरीस हा संवाद येतो, ‘ही तीच तीस्ता की नवीच कुणी?’ असा प्रश्न पडलेला मदारी जंगलात कायमचा निघून जातो. त्या कादंबरीला १९९० सालचा ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ देखील मिळाला आणि ‘गाथा तीस्ता पार की’ या नावाने ती हिंदीतही आली.. प्रत्यक्षात ‘तीस्ता बराज’ १९९३ साली पूर्ण झाले; तेव्हापासून अनेकांना, अनेकदा देबेश राय यांचे हे द्रष्टे शब्द आठवत राहिले! साहित्याची- विशेषत: कादंबरीची- नवी भूमी शोधणाऱ्या भारतीय लेखकांपैकी महत्त्वाचे ठरलेले देबेश राय अलीकडेच, १४ मे रोजी निवर्तले.

विभाजित बंगालच्या पबना जिल्ह्य़ात १९३६ साली जन्मलेले देबेश राय वयाच्या सातव्या वर्षीपासून न्यू जलपैगुडी येथे राहू लागले. तिथेच शिकून कोलकात्यास उच्चशिक्षणासाठी आले. पण १९५५ च्या सुमारास, साम्यवादाचे वारे लागून कार्यकर्ता झाले. तळागाळातील पक्षकार्यासाठी त्यांची रवानगी झाली तीस्तेच्याच काठी. तिथली ‘राजबंशी’ किंवा ‘कामरूपी’ म्हणून ओळखली जाणारी बोली त्यांनी आत्मसात केली. या बोलीतील म्हणी, लोककथा यांमध्ये ते गुंतत गेले.. त्यांनी कादंबरीत हे भाषावैविध्य वापरलेच, पण बोलींमध्ये संस्कृती असते, स्थानिक-प्रादेशिक शहाणीवदेखील असते, हे सत्य त्यांना गवसले. त्यांनी १९६९चा साम्यवादी भ्रमनिरास घडत होता, तोवर देबेश राय यांचे रूपांतर लेखकात झालेले होते! ‘तीस्ता ही स्वतंत्र देवता आहे’ हा विश्वास साम्यवादी नास्तिकच्या बरोबरीने त्यांनी स्वीकारला होता.. तीस्ताकाठावर रुजून ते नव्याने उमलले!

या नव्या उमलण्यात बुद्धिवादाची आर्षता होती; पण मानवी प्रतिष्ठेला अंगभूतपणे न्याय देणारी लोकधाटी टिकवण्यासाठी आधुनिक काळात बुद्धी कशी वापरावी, याची जाणही होती. बारा कादंबऱ्या आणि कथासंग्रह, कादंबरीविषयक चिंतनाची ‘उपन्यास निए’ आणि ‘उपन्याशेर नूतन धरणीर खोंजे’ ही पुस्तके, अशी त्यांची ग्रंथसंपदा. यापैकी ‘उपन्यास निए’मध्ये त्यांनी प्रेमचंद, फकीर मोहन सेनापति, वायकोम मोहम्मद बशीर अशा कादंबरीकारांमुळे भारतीय कादंबरीचा प्रवाह कसा रुळला, हे विशद केले आहे. स्वत: देबेश राय हेदेखील त्याच प्रवाहातील एक. ‘तीस्ता पारेर बृत्तान्तो’, ‘तीस्ता पुराण’, ‘बारिशालेर जोगेन मंडल’ या महत्त्वाच्या साहित्यकृती मराठीपर्यंत पोहोचण्याआधी ते गेले.