21 November 2017

News Flash

डॉ. बिना अगरवाल

बिना अगरवाल यांना यंदाचा ‘बालझान फाऊंडेशन’ पुरस्कार मिळाला आहे.

लोकसत्ता टीम | Updated: September 13, 2017 2:12 AM

डॉ. बिना अगरवाल

 

अर्थशास्त्रातील प्रमाणित सिद्धांतांना सतत आव्हान देत शास्त्रकाटय़ाच्या कसोटीवर घासणाऱ्या भारतीय अर्थशास्त्रज्ञ अशी त्यांची ओळख. ग्रामीण अर्थव्यवस्था हा अभ्यासाचा विषय. जोसेफ स्टिगलिट्झ यांच्यासारख्या नामवंत अर्थशास्त्रज्ञांबरोबर काम करण्याची मिळालेली संधी यामुळे विशेष परिचित असलेल्या बिना अगरवाल यांना यंदाचा ‘बालझान फाऊंडेशन’ पुरस्कार मिळाला आहे. ७ लाख ९० हजार डॉलर्सचा हा पुरस्कार आहे. नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱ्यांना तो दिला जातो. बिना अगरवाल यांनी सैद्धांतिक आर्थिक विचार थेट वंचितांच्या समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी वापरला, हे त्यांचे वैशिष्टय़.

सध्या त्या ब्रिटनच्या मँचेस्टर विद्यापीठात विकास अर्थशास्त्र व पर्यावरण या विषयाच्या प्राध्यापक आहेत. त्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’साठी आर्थिक विषयांवर स्तंभलेखनही केले होते. जमीन, रोजीरोटी, मालमत्ता हक्क, पर्यावरण, विकास व लिंगभावाधारित राजकीय अर्थशास्त्र, गरिबी व असमानता, कायद्यातील बदल, कृषी व तांत्रिक स्थित्यंतरे अशा अनेक विषयांत त्यांचा अभ्यास आहे. ‘अ फील्ड ऑफ वन्स ओन- जेंडर अ‍ॅण्ड लॅण्ड राइट्स इन साऊथ एशिया’ हे त्यांचे गाजलेले पुस्तक, त्यासाठी त्यांना कुमारस्वामी, एडगर ग्रॅहम, के. एच. भतेजा असे तीन पुरस्कार मिळाले होते.

दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेतून त्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली. केम्ब्रिज विद्यापीठातून त्या बीए व एमए झाल्या. हार्वर्ड, प्रिन्स्टनसह अनेक नामवंत विद्यापीठांत त्या प्राध्यापक होत्या. ‘सायकॉलॉजी, रॅशनॅलिटी अ‍ॅण्ड इकॉनॉमिक बिहॅवियर, कॅपॅबिलिटीज फ्रीडम अ‍ॅण्ड इक्व्ॉलिटी’, ‘जेंडर अ‍ॅण्ड ग्रीन गव्हर्नन्स’ अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. अर्थतज्ज्ञ स्टिगलिट्झ यांच्या नेतृत्वाखालील कमिशन फॉर मेजरमेंट ऑफ इकॉनॉमिक परफॉर्मन्स अ‍ॅण्ड सोशल प्रोग्रेस या समितीत काम करणाऱ्या त्या एकमेव महिला. संयुक्त राष्ट्रांच्या अनेक संस्थांत त्यांनी काम केले आहे. २००५ मध्ये त्यांनी हिंदू वारसा कायद्यातील लिंगभाव समानतेबाबत दुरुस्तीसाठी मोहीम सुरू केली होती. त्यांना शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी २००८ मध्ये ‘पद्मश्री’ने गौरवण्यात आले.

त्या केवळ प्राप्त आकडेवारीवर विसंबून काम करणाऱ्या अर्थशास्त्रज्ञ नाहीत, त्यांनी १९९८-९९ मध्ये भारतातील सात राज्ये व नेपाळ अशा ठिकाणी फिरून महिलांना अर्थव्यवस्थेत असलेले स्थान नेमके किती आहे, याची आकडेवारी काही निकषांच्या आधारे गोळा केली होती. त्याहीआधी त्या १९७० मध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेवर डॉक्टरेट करीत असताना हरित क्रांती जोरात होती, शेतीच्या यांत्रिकीकरणाचे गोडवे गायले जात होते, त्यामुळे उत्पादन वाढले वगैरे दावे करण्यात आले, पण बिना अगरवाल यांनी त्यांच्या संशोधनातून हे दाखवून दिले, की इतर घटक स्थिर ठेवले तर केवळ यांत्रिकीकरणामुळे कृषी उत्पादन वाढलेले नाही, उलट यंत्रांनी माणसांना विस्थापित केले. चीनप्रमाणे महिलांना उत्पादन क्षेत्रात संधी देता येणार नाही का, या प्रश्नावर त्यांनी अलीकडेच असे सांगितले होते, की मुळात आपल्याकडे उत्पादन क्षेत्रात प्रगतीच नाही तर रोजगार देण्याची गोष्ट दूर! मध्यमवयीन स्त्रिया शेतीकामांकडून दुसरीकडे वळू शकत नाहीत. ग्रामीण भागातील तरुण मुली हा पायंडा मोडून नवीन काही तरी करू शकतात. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार नाही व शेती उत्पन्नात वाढ नाही, ही आताच्या आंदोलनांची कारणे आहेत, असे निरीक्षण त्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत नोंदवले होते. त्यांचे संशोधन हे केवळ पुस्तकी नसून प्रत्यक्ष परिस्थितीशी मेळ असलेले आहे. त्यामुळेच आजच्या काळातील आर्थिक समस्यांच्या उत्तरांसाठी ज्यांच्याकडे आशेने बघावे, अशा अर्थशास्त्रज्ञांपैकी त्या एक आहेत.

First Published on September 13, 2017 2:12 am

Web Title: dr bina agarwal economist