23 January 2018

News Flash

डॉ. देवराज सिक्का

अनेकांनी त्यांच्या या सिद्धांतास विरोध करूनही ते ठाम राहिले.

लोकसत्ता टीम | Updated: March 20, 2017 12:30 AM

प्रशांत महासागरात सागरी जलातील तापमानाच्या चढउतारांमुळे एल निनो परिणाम घडून येतो व त्याचा संबंध थेट भारतीय मान्सूनशी आहे, हे १९८२ मध्ये डॉ. देवराज सिक्का यांनी सर्वात आधी सांगितले होते. त्या वेळी आपल्या हवामान अभ्यासावर पाश्चात्त्य वैज्ञानिकांचा नको तितका प्रभाव होता, तरीही अनेकांनी त्यांच्या या सिद्धांतास विरोध करूनही ते ठाम राहिले. आज आपण एल निनो व ला निना यांचे पावसावरील परिणाम पाहतो आहोत. त्यामुळे काळाच्या पलीकडे जाऊन दूरदृष्टीने संशोधन करणारे देवराज सिक्का हे हवामानशास्त्रातील भीष्म पितामह होते यात शंका नाही.

एल निनोबाबत सांगायचे तर त्याच्याशी संबंधित दहा एल निनो वर्षांपैकी सहा वर्षांत भारतामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे, त्यामुळे सिक्का यांचे अनुमान बरोबर ठरले आहे. भारतीय हवामान खात्यात कारकीर्द सुरू करणारे सिक्का यांनी अनेक हवामान प्रारूपे तयार केली होती व मान्सूनच्या अंदाजासाठी संगणकाधारित प्रारूप तंत्र विकसित केले होते. त्यांचा जन्म पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा भाग असलेल्या झांग मघनिया येथे झाला होता. फाळणीनंतर ते कुटुंबीयांसमवेत भारतात आले. आग्रा विद्यापीठातून त्यांनी फिजिकल केमिस्ट्री या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली होती. नंतर १९५४ ते १९६३ या काळात त्यांनी भारतीय हवामान खात्यात काम केले. १९६४ मध्ये ते पुण्याच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मिटिरिऑलॉजी या संस्थेत संचालक झाले व नंतर त्याच संस्थेतून ते निवृत्त झाले. त्यांनी या संस्थेत काम करताना मान्सून गतिकी, वातावरणीय रसायनशास्त्र, उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र यावर मोठे काम करताना संस्थेला मोठी उंची गाठून दिली. मान्सून व एल निनो, वॉकर सक्र्युलेशन, टोकाची हवामान स्थिती, भारतीय मान्सून हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. पुढील साठ वर्षे त्यांच्या संशोधन निबंधांचा आधार देशातील वैज्ञानिक घेत असत. परदेशातील अनेक शैक्षणिक व संशोधनांशी त्यांचा थेट संबंध होता. मान्सून अंदाज सुधारण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने मान्सून मिशन सुरू केले होते, त्याचे ते अध्यक्ष होते. आपल्याला दिसणारे हवामानातील बदल व त्यामागची कारणमीमांसा समजून घेणे आवश्यक असते. आपल्याला त्याबाबत अनेक प्रश्नही पडत असतात, पण त्याची उत्तरे मिळत नाहीत; पण सिक्का यांच्याकडे जाऊन कुणीही केव्हाही हवामान, मान्सून याबाबत शंकांचे समाधान करून घेऊ शकत होते. . मान्सूनबाबत ज्ञानातील पारंगततेमुळे ते ‘मान्सून मॅन’ म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या मान्सून मिशन कार्यक्रमामुळे लघू व दीर्घकालीन हवामान अंदाज करणे शक्य झाले. सीएसआयआरच्या हवामान बदल अभ्यास समितीचे व नॅशनल सेंटर फॉर मेडियम रेंज वेदर फोरकास्टचे ते अध्यक्ष होते. इंडियन मिटिरिऑलॉजिकल सोसायटीने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. सर गिलबर्ट वॉकर सुवर्णपदक हा मानाचा पुरस्कार त्यांना  मान्सूनवरील संशोधनासाठी मिळाला होता. ‘स्कायमेट वेदर सव्‍‌र्हिसेस लि.’ या खासगी हवामान अंदाज कंपनीच्या वतीने दरवर्षी मान्सून व हवामान अंदाजाबाबत उत्कृष्ट शोधनिबंध सादर करणाऱ्या वैज्ञानिकास देवराज सिक्का उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार दिला जातो. त्यांच्या निधनामुळे हवामान अंदाज क्षेत्रातील एका तज्ज्ञ मार्गदर्शकास देश मुकला आहे.

 

First Published on March 20, 2017 12:30 am

Web Title: dr devraj sikka
  1. No Comments.