जगातील बुद्धिमान वैज्ञानिक म्हणून नाव कमावलेल्या आइन्स्टाइनचा १९५५ मध्ये मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मेंदूवर संशोधन करणारे काही वैज्ञानिक होते. त्यात सर्वात महत्त्वाचे असे संशोधन करणाऱ्या मेंदू वैज्ञानिक म्हणजे डॉ. मेरियन डायमंड. आजही जिथे जिथे बुद्धिमत्तेचा संबंध येतो तिथे आइन्स्टाइनशी तुलना होतेच. त्यामुळे आइन्स्टाइनच्या मेंदूत वेगळे असे काय होते याविषयी ज्यांना उत्सुकता होती त्यातील एक असलेल्या डायमंड यांनी १९८० मध्येच त्याच्या मेंदूवर संशोधन सुरू केले. त्यामुळे डायमंड यांचे नाव तेव्हापासून चर्चेत होते. आइन्स्टाइनचा मेंदू जतन करून ठेवण्यात रोगनिदानतज्ज्ञ थॉमस हार्वी यांचा पुढाकार होता. नंतर तो मेंदू फॉर्मल्डिहाइडमध्ये ठेवून जतन करण्यात आला. आइन्स्टाइनच्या मेंदूचा नमुना संशोधनासाठी मिळावा, अशी विनंती डॉ. डायमंड यांनी केल्यानंतर १९८४ मध्ये त्यांना त्याच्या मेंदूचे चार पापुद्रे पाठवण्यात आले. त्यांनी या तुकडय़ांचा जो अभ्यास केला त्याने संशोधनाला नवी दिशा मिळाली. आइन्स्टाइनच्या मेंदूत ग्लायल पेशी जास्त होत्या असे त्यांना त्याचे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करताना दिसले. त्या काळात या पेशी फार महत्त्वाच्या नसतात, असा समज होता तो त्यांनी खोडून काढला. मेंदूच्या बोधनक्षमतेत त्यांचा मोठा वाटा असतो असे त्यांनी दाखवून दिले. याखेरीज, लहान मुले ज्या वातावरणात वाढतात, त्यांचे पोषण ज्या पद्धतीने होते त्यावर त्यांच्या मेंदूचा विकास अवलंबून असतो, असे त्यांनी उंदरांवरील प्रयोगातून दाखवले होते.

मेरियन यांचा जन्म कॅलिफमधील ग्लेनडेल येथे १९२६ मध्ये झाला, त्यांचे वडील डॉक्टर होते. १९४८ मध्ये त्या पदवीधर झाल्या, तेव्हा शरीरविज्ञानातील त्या पहिल्या महिला पदवीधर होत्या. १९५३ मध्ये त्यांनी डॉक्टरेट केली. १९५५ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातील पहिल्या विज्ञान प्रशिक्षक म्हणून त्या रुजू झाल्या. पाच वर्षांनी त्या बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक झाल्या. यूटय़ूबवरच्या सर्वात लोकप्रिय प्राध्यापक म्हणूनही त्यांनी नाव कमावले. त्यांचे शरीरशास्त्रावरील व्हिडीओ १० लाख वेळा बघितले गेले आहेत. डॉ. डायमंड या बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात जीवशास्त्राच्या प्राध्यापक होत्या. त्या जेव्हा शिकवायच्या तेव्हा विद्यार्थ्यांच्या रांगातून फिरताना त्यांच्या गळ्यात एक पेटी असायची. त्यात मानवी मेंदूचा खरा नमुना असायचा. तो घेऊनच त्या मेंदूची रचना शिकवायच्या तेव्हा हा ‘सूर्य अन् हा जयद्रथ’ अशीच स्थिती असायची. पुस्तकी शिक्षणापेक्षा त्यांचे अध्यापन वेगळे होते.

‘मेंदू आहे तसा राहतो, त्यात बदल होत नाही’ हा समज त्यांनी खोडून काढला, स्त्री व पुरुषांच्या मेंदूची रचना वेगळी असते पण त्यातील उद्दीपनावरच प्रतिकारशक्ती अवलंबून असते, हे त्यांनीच दाखवून दिले. मेंदूला चालना देणाऱ्या शारीरिक व मानसिक कृती त्यांनी लोकांना शिकवल्या. अगदी २०१४ पर्यंत त्यांचे संशोधन व अध्यापन सुरू होते. ‘माय लव्ह अफेअर विथ द ब्रेन – द लाइफ अ‍ॅण्ड सायन्स ऑफ डॉ. मेरियन डायमंड’ हा त्यांच्यावरील माहितीपट मेंदूविषयीच्या आपल्या संकल्पना प्रगल्भ करणारा आहे. मेंदू वापरा नाहीतर तो गंजून जाईल असे त्या नेहमी सांगत असत. कुठल्याही वयात मेंदूच्या विकासासाठी आहार, व्यायाम, आव्हाने, नावीन्य व प्रेम या गोष्टी आवश्यक असतात असे त्यांनी प्रयोगानिशी दाखवून दिले होते. त्यांच्या जाण्याने मेंदूबाबतचा चालता बोलता ज्ञानकोश आता आपण गमावला आहे.