आपल्या अलौकिक प्रतिभेने हिंदी साहित्यात तळपणाऱ्या कृष्णा सोबती, त्यानंतर निराला यांच्या साहित्याची वेगळ्या अंगाने समीक्षा करणाऱ्या अर्चना वर्मा आणि आता हिंदी समीक्षेला वेगळ्या उंचीवर नेणारे व्यासंगी समीक्षक, साहित्यिक आणि अत्यंत प्रभावी वक्ते डॉ. नामवर सिंह हे तिघे जण काही दिवसांच्या अंतराने निघून जाण्याने हिंदी साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे.

उत्तर प्रदेशातील आताच्या चंदौली जिल्ह्य़ात २८ जुलै १९२६ रोजी नामवर सिंह यांचा जन्म झाला असला तरी सरकारी शाळेत १ मे हीच त्यांची जन्मतारीख नोंदली गेली. तरुणपणी चे गव्हेरा यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर असल्याने ते साम्यवादाकडे झुकले. हिंदी साहित्यात एमए व पीएच.डी. केल्यानंतर ते बनारस हिंदू विद्यापीठात व्याख्याते म्हणून रुजू झाले. कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून १९५९ मध्ये चंदौलीमधून लोकसभा निवडणूकही लढले, पण पराभूत झाले. नंतर त्यांना बनारस हिंदू विद्यापीठ सोडावे लागले. तेथून ते सागर विद्यापीठात गेले. तेथील अभ्यासक्रम बदलण्याच्या मुद्दय़ावरून व्यवस्थापन परिषद व कुलगुरूंशी मतभेद झाल्याने तेथूनही ते बाहेर पडले. त्यांची प्रतिभा खऱ्या अर्थाने फुलली ती ‘जेएनयू’मध्ये. प्रदीर्घ काळ तेथे अध्यापन केल्यानंतर भारतीय भाषा केंद्राचे प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही अनेक वर्षे त्यांना अध्यापनासाठी बोलावले जात असे. प्रेमचंद और भारतीय समाज, छायावाद- प्रसाद, निराला, महादेवी और पंत, काशी के नाम अशी विपुल ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. पण ‘कविता के नए प्रतिमान’ हा त्यांचा ग्रंथ हिंदी समीक्षेतील मैलाचा दगड मानला जातो. डॉ. नामवर सिंह यांच्या या काव्य-समीक्षेवर दीर्घकाळ चर्चासत्रे व परिसंवाद झडत राहिले.

नव्या लेखकांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले. ‘आलोचना’ या त्रमासिकाचे संपादन करताना त्यांनी अनेक नव्या दमाचे प्रतिभाशाली लेखक शोधून त्यांना लिहिते केले. साम्यवादी असले तरी त्यातील त्रुटींवरही ते परखडपणे मते मांडत. दोन-तीन वर्षांपूर्वी दादरी येथील घटनेनंतर पुरस्कारवापसीचे पर्व सुरू झाले तेव्हा त्यांनी ‘अहिष्णुतेचे वातावरण आताच निर्माण झाल्याची आवई उठवणे हा शुद्ध वेडेपणा’ असल्याची टीका आपल्याच साहित्यिक मित्रांवर केली होती. नामवर सिंह यांना साहित्य अकादमी व अन्य अनेक पुरस्कार मिळाले. ते बरीच वर्षे ज्ञानपीठ पुरस्कार निवड मंडळात होते.  हा मानाचा साहित्य पुरस्कार मिळण्यास तेही सर्वथा पात्रच होते. पण तो पुरस्कार मिळण्यापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.