28 February 2021

News Flash

डॉ. शैबल गुप्ता

राज्यांचा विकास निर्देशांक ठरवण्यासाठी नेमलेल्या डॉ. रघुराम राजन समितीत ते एक सदस्य होते.

डॉ. शैबल गुप्ता

बिहारसारख्या बिमारू राज्यांपैकी एक असलेल्या राज्यात राहून अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयांत नावलौकिक मिळवलेले शैबल गुप्ता हे या क्षेत्रातील बुद्धिवंतांपैकी एक. त्यांच्या निधनाने एक चांगला अर्थमार्गदर्शक देशाने गमावला आहे. बिहारसारख्या गरीब राज्याचे अर्थकारण सुधारण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले. १९९१ मध्ये देश आर्थिक स्थित्यंतराच्या मार्गावर असताना ‘आशियाई विकास संशोधन संस्था’ (एडीआरआय) स्थापन करण्यात त्यांचा पुढाकार होता. या संस्थेमुळे पाटण्यात डॉ. अमर्त्य सेन, डॉ. रघुराम राजन, डॉ. जोसेफ स्टिगलित्झ, लॉर्ड मेघनाद देसाई यांच्यासारख्या मंडळींचा वावर असायचा. बिहारला विशेष दर्जा मिळावा यासाठी त्यांनी नेहमीच बाजू मांडली. बिहारचे आर्थिक सर्वेक्षण त्यांच्या मार्गदर्शनाखालीच तयार होत असे. ते समाजशास्त्रज्ञही असल्याने त्यांना वास्तवाची जाणीव होती. त्यातून त्यांनी आर्थिक पातळीवर मांडलेल्या उपाययोजना नेहमी व्यवहार्य असत. सेंटर फॉर पॉलिसी अँड पब्लिक फायनान्स ही संस्थादेखील त्यांनी बिहारमध्ये स्थापन केली. त्याचे ते संचालक होते. गुप्ता यांनी पाटणा विद्यापीठातून १९७७ मध्ये अर्थशास्त्रात एम. ए. केले. नंतर त्याच विद्यापीठातून ते विद्यावाचस्पती (पीएच.डी.) झाले. त्यांनी ससेक्स येथे इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज या संस्थेत तसेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, जागतिक बँक, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या नामवंत संस्थांत काम केले होते. भारतीय राष्ट्रीय साक्षरता अभियानाचे ते सदस्य होते तसेच काही काळ आंध्र बँकेचे संचालक होते. ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’शी (एलएसई) शैक्षणिक पातळीवर असलेल्या संबंधांचा लाभ त्यांनी बिहारला धोरणात्मक निश्चितीसाठी नेहमीच करून दिला. विशेष म्हणजे ‘एलएसई’चे एक उपकेंद्र एडीआरआय या संस्थेत आहे. राज्यांचा विकास निर्देशांक ठरवण्यासाठी नेमलेल्या डॉ. रघुराम राजन समितीत ते एक सदस्य होते. संस्थांची उभारणी, सामाजिक आर्थिक प्रश्नांची पुरेपूर जाण व राजकीय प्रश्नांचे आकलन ही त्यांची वैशिष्टय़े होती. लालूप्रसाद यादव तसेच नंतर नितीशकुमार यांच्या सरकारांना त्यांनी सामाजिक, आर्थिक प्रश्नांवर अभ्यास करून काही दस्तऐवजीकरण करण्यात मदत केली. बिहारची ओळख गुन्हेगारीचे राज्य, गरीब राज्य अशी राहता कामा नये यासाठी त्यांनी नेहमीच आग्रह धरला. त्यांचे ‘स्टॅगनेशन अँड ग्रोथ व स्पेशल कॅटेगरी स्टेटस- अ केस ऑफ बिहार’ हे पुस्तकही प्रसिद्ध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2021 12:05 am

Web Title: dr shabal gupta abn 97
Next Stories
1 अख्तर अली
2 मठूर गोविन्दन कुट्टी
3 र. ग. कर्णिक
Just Now!
X