इजिप्तमधील टोरा तुरुंग म्हणजे मसणवटा. जिथे स्वप्नं मारली जातात.. तिथे एक स्वप्नाळू वृत्तछायाचित्रकार पिचत पडलाय, नाव आहे महमूद अबू झैद. इजिप्तमध्ये २०१३च्या उन्हाळ्यात जी सरकारविरोधी निदर्शने झाली होती, त्यात हा मुक्त छायापत्रकार पकडला गेला, त्याच्यावर शस्त्र बाळगल्याचा आरोप ठेवून थेट त्याची रवानगी कारागृहात झाली. त्याच्याकडे शस्त्र होतेच म्हणायचे तर तो होता कॅमेरा. छायाचित्रण हा त्याचा आवडता छंद, पण त्याने एक वेगळे वळण घेतले. त्याची आवड त्याच्या जीवावर बेतली. याच महमूदला २ मे रोजी घाना येथे होणाऱ्या कार्यक्रमात युनेस्कोचा आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र स्वातंत्र्य पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी यांनी तीन वर्षांपूर्वी सत्ता हस्तगत केली, त्या वेळी प्रसारमाध्यमांवर कारवाईचा वरवंटा फिरला. २३ पत्रकार तुरुंगात टाकले गेले. २०१३ मध्ये महंमद मोर्सी यांचे समर्थक व लष्कर यांच्या कैरोतील चकमकी टिपणाऱ्या छायापत्रकारातील एक म्हणजे महमूद. त्याने काढलेली छायाचित्रे बघितली तर आपण थक्क होऊन जातो, इतक्या वेगवेगळ्या कोनांतून ती टिपलेली आहेत. आज महमूद अतिशय कृश, गलितगात्र होऊन तुरुंगात दिवस कंठत आहे. कुठला श्वास शेवटचा ठरेल हे न सांगण्याइतकी ही वाईट अवस्था. त्याची आई रीडा अ‍ॅली दर आठवडय़ाला तुरुंगात त्याला भेटायला जाते, तिच्यासाठी तो मुलगाच, म्हणून चॉकलेट नेते आजही. तिला मुलाचा सार्थ अभिमान आहे. तो कैरोच्या रस्त्यावर पूर्वी हुंदडत होता, रस्त्यावरच राहायचा, तेथेच अभ्यास करायचा. आता तो एका छोटय़ाशा काळकोठडीत बंद आहे. जिथे त्याच्याबरोबर त्या जागेत अनेकांना कोंबले आहे. त्याला हेपॅटायटिसची लागण झाली असूनही उपचार नाकारण्यात आले. तो इजिप्शियन नागरिक असला, तरी वाढला मात्र कुवेतमध्ये. त्याचे आईवडील शिक्षक आहेत. कैरोत २००९ मध्ये परतल्यावर त्याने पत्रकारिता सुरू केली. त्यानंतर तीनच वर्षांनी अध्यक्ष होस्नी मुबारक यांचा पाडाव झाल्याने त्याला पत्रकारितेत संधी व आव्हान दोन्ही मिळाले. त्याचे लाडके नाव शौकन. त्याच्या नावाने ‘फ्रीडम फॉर शौकन’ ही फेसबुक मोहीमही राबवली गेली. नोकियाच्या मोबाइल फोनला असलेल्या कॅमेऱ्यामुळे तो छायापत्रकारितेक डे ओढला गेला. वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी लागणारे धैर्य त्याच्याकडे आहे. त्यामुळे या स्वातंत्र्यात जगामधील १८० देशांमध्ये १६१व्या क्रमांकावर असलेल्या इजिप्तमध्ये तो लढतो आहे. त्याला मृत्युदंडाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. २ मे रोजी त्याला बहुदा अनुपस्थितीतच हा पुरस्कार दिला जाईल. मी पत्रकार आहे गुन्हेगार नाही.. ही त्याची आर्त हाक अजूनही कोठडीला धडका देते आहे.