‘कन्नडमध्ये ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ मिळवणाऱ्या पहिल्याच महिला-लेखिका’ ही गीता नागभूषण यांची आवर्जून करून दिली जाणारी ओळख, स्त्रीवादी आग्रहांशी काहीशी विसंगतच! अशा विसंगतींसह खुशाल जगणारा समाज पाहून त्या लिहू लागल्या.. अन्यथा, ‘गुलबग्र्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी करणारी पहिलीच सुशिक्षित मुलगी’ हीसुद्धा १९६० च्या आसपास त्यांची ओळख होतीच! त्यांचे निधन अलीकडेच झाले, त्यानंतर उरणारी त्यांची ओळख म्हणजे, कन्नड साहित्यात स्त्रीवादी व दलित प्रवाह रुळवणाऱ्या महत्त्वाच्या साहित्यिकांपैकी त्या एक.

‘अव्वा मत्तु इतर कथेगळु’ किंवा ‘अवरकथे’, ‘बदुकु’ या कादंबऱ्या यांतून कुणा एका नायिकेची कथा सांगण्याऐवजी स्त्रीजीवनाला केंद्रस्थान देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. गीता यांचे वडील मुलीला शिकू देणारे. १९४२ मध्ये गुलबग्र्यात (आता कलबुर्गी) जन्मलेल्या व पहिला विवाह मोडल्यानंतर नोकरी सांभाळून बीए होऊन, पुढे शिकण्यासाठी वेळ मिळावा म्हणून सोलापूरला शिक्षिकेची नोकरी पत्करून एम.ए. झालेल्या आणि त्या काळात नागभूषण यांच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या अशाही बहुधा त्या ‘एकमेव व्यक्ती’ ठरवल्या जातील! पण ही व्यक्तिवादी विशेषणे बेगडीच, याचे भान त्यांना होते.

Loksatta editorial indian Ambassador Akhilesh Mishra has slammed an Irish Newspaper for publishing an editorial on PM Narendra Modi
अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री?
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला

१९६८ मध्ये पहिली कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर एकंदर २७ कादंबऱ्या, ५० कथा, १२ नाटके त्यांनी लिहिली (नाटके अनुवादितही आहेत). त्यापैकी ‘हसी मांस मत्तु हाडगळु’ ही कादंबरी ‘तरंग’ नियतकालिकात प्रकाशित झाली आणि पुढे ‘हेण्णिन कूगु’ हा चित्रपटही त्यावर निघाला. त्या कादंबरीच्या शेवटी, कुलकण्र्याकडून छळ झालेली लच्छी या संबंधातून मुलगा झाला म्हणून त्याला पाण्यावर सोडते आणि म्हणते, ‘मुलगी झाली असती तर वाढवले असते तिला’! ‘बदुकु’मध्ये कामगारवस्तीतील अनेकींचे जिणे मांडणारी कादंबरी साहित्य अकादमी पुरस्कारास (२००४) पात्र ठरली. पण उमेदीच्या काळात ‘म्हैसूर नव्हे गुलबग्र्याच्या- पुरुष नव्हे स्त्री- सुखवस्तू नव्हे गरिबाघरच्या, सवर्ण नव्हे अवर्ण’ असा भेदभाव गीता यांना भरपूर दिसला होता. १९९८ मध्ये ‘राज्योत्सव प्रशस्ती’ पुरस्कार त्यांना मिळाला. पुढे त्यांच्या साहित्यावर पीएच.डी. झाली, २०१६ साली कर्नाटक साहित्य अकादमीने ‘व्यक्ती आणि साहित्य’ असे २१० पानी पुस्तकही (ले. प्रमिला माधव) काढले, गुलबर्गा व हम्पी विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेट दिली, २०१० मध्ये त्या अ. भा. कन्नड साहित्य संमेलनाध्यक्षही झाल्या.  या यशापल्याड असलेल्या वस्त्यांपर्यंत, तिथल्या ‘आयदाना’पर्यंत कन्नड वाचकांना पोहोचवण्याचे महत्कार्य त्यांनी केले.