रसायने, प्लास्टिक आणि कृषी उत्पादनांसाठी ओळखली जाणारी डाऊ ही जगातील एक बलाढय़ कंपनी. याच डाऊ कंपनीच्या अमेरिकेतील प्रयोगशाळेत जॉर्ज ओला यांनी सुरुवातीचे संशोधन केल्यानंतर पुढे त्यांना रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक १९९४ साली बहाल करण्यात आले होते.

१९२७ मध्ये हंगेरीत जन्मलेले ओला हे ज्यू होते. पण त्यांनी ही ओळख अनेक वर्षे लपवून ठेवली. बुडापेस्ट येथील नावाजलेल्या शाळेत त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले. शालेय जीवनात इतिहास आणि साहित्य या विषयांत त्यांना विशेष रुची होती. माध्यमिक शाळेत आल्यानंतर मात्र त्यांना रसायनशास्त्र हा विषय आवडू लागला. इतिहास, साहित्य सोडून ते रसायनांतच गुंतले ते आयुष्यभर. १९४९ मध्ये त्यांना बुडापेस्ट येथील टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून पीएच.डी. मिळाली. १९५६ पर्यंत ते बुडापेस्ट येथील केमिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट येथे कार्यरत होते. त्याच हंगेरीत उठाव झाल्याने हजारो लोकांना तेथून परागंदा व्हावे लागले. त्यात ओलाही होते. डाऊ कंपनीने सर्निया येथे छोटी प्रयोगशाळा उभारण्याची तयारी सुरू केली होती. तेव्हा कॅनडात असलेल्या ओला यांना कंपनीने चांगले वेतन देऊ केल्याने ते कुटुंबासह सर्निया येथे गेले. १५ ते २० कर्मचारी असलेल्या या प्रयोगशाळेत ते रुजू झाले. सर्निया हे अतिशय शांत आणि तितकेच रमणीय शहर असल्याने ओला यांना संशोधनासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरले. त्यांच्या नोबेल पारितोषिकाचा पायादेखील, एका परीने याच ठिकाणी रचला गेला!

जॉर्ज ओला यांना १९९४ मध्ये रसायनशास्त्राचे नोबेल हे कार्बन संयुगांच्या रासायनिक अभिक्रियांच्या अभ्यासासाठी मिळाले होते. हायड्रोकार्बनच्या अभ्यासात त्यांनी अधिक चांगल्या प्रकारे ज्वलनशील असलेल्या गॅसोलिनचा शोध लावला होता. त्यांच्या संशोधनातून काही नवीन औषधांची निर्मितीही शक्य झाली. डाऊ कंपनीत आम्ल उत्प्रेरकाधिष्ठित अभिक्रियांचा वापर स्टायरिनच्या निर्मितीसाठी केला जातो. ते पॉलिस्टरीनचे पूर्वरूप आहे. डॉ. ओला यांनी महाआम्ले म्हणजे सुपरअ‍ॅसिड्सचा शोध लावला, ती आम्ले सल्फ्युरिक आम्लापेक्षा लाखो पटींनी तीव्र होती. हायड्रोकार्बन रसायनशास्त्रात महाआम्लांना फार महत्त्वाचे स्थान आहे. हायड्रोकार्बनचे रेणू अल्पजीवी काबरेकेशन रेणूंमुळे अवस्थांतरित होतात असे म्हटले जात होते, पण त्यात काबरेकेशन रेणू क्षणात निर्माण होऊन नष्ट होत, म्हणजे एकअब्जांश सेकंदात त्यांचे अस्तित्व संपलेले असे. त्यामुळे काबरेकेशन्स अस्तित्वात नसतात असे काही रसायनशास्त्रज्ञांना वाटत होते. पण डॉ. ओला यांनी काबरेकेशन रेणू विशिष्ट आम्लात बुडवून काही काळ त्यांचे अस्तित्व टिकवले, त्यांना ‘जादूसारखे’ स्थिर केले असे यूएससीचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक जी. के. सूर्यप्रकाश सांगतात. नंतरच्या काळात त्यांनी काबरेकेशनची रचना व वर्तन शोधून काढले. १९६० ते ७० च्या काळात ती मोठी कामगिरी होती. ओला यांच्या संशोधनाने काबरेकेशनचे एक नवे विश्व खुले झाले व त्यातून आधुनिक कार्बनी रसायनशास्त्र बदलून गेले. कार्बनी संयुगात कार्बनचा अणू इतर चार अणूंना चिकटतो, पण ओला यांनी असे दाखवून दिले की, काबरेकेशनमध्ये कार्बनचा एक अणू पाच, सहा किंवा सात अणूंना जाऊन चिकटतो, ही वेगळी बाब होती. त्यांच्या सर्व संकल्पना खऱ्या सिद्ध झाल्या, त्यामुळेच त्यांना नोबेलपर्यंत मजल मारता आली.

‘अ लाइफ ऑफ मॅजिक केमिस्ट्री’ हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले. त्यात त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख केला आहे. ओला यांच्या निधनाने रसायनशास्त्रातील फार मोठा शास्त्रज्ञ जगाने गमावला आहे.