समर प्रसंगात पायदळ, हवाई दल व नौदल या तिन्ही शाखांनी संयुक्तपणे काम करण्याचे बीजारोपण करणाऱ्या आणि जागतिक पातळीवर प्रतिष्ठित लष्करी प्रशिक्षण संस्था म्हणून नावारूपास आलेल्या पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे उपप्रमुख (डेप्युटी कमांडंट) आणि मुख्य प्रशिक्षक अशी जबाबदारी तितकाच प्रचंड अनुभव गाठीशी असणाऱ्या हवाई दल उपप्रमुख संदेश वागळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
जगात तिन्ही दलांच्या संयुक्त कार्यवाहीच्या व्यवस्थापनासाठी चीनसह बडय़ा राष्ट्रांनी खास यंत्रणा विकसित केली आहे. या नियोजनाचा भारत विचार करत असला तरी प्रबोधिनीत प्रारंभीची अडीच वर्षे तिन्ही दलांच्या प्रशिक्षणार्थीना संयुक्तपणे दिले जाणारे शिक्षण हा त्याचाच एक भाग. प्रबोधिनीतील उपरोक्त पदाचा कार्यभार नुकताच वागळे यांनी स्वीकारला. २४ नोव्हेंबर १९६२ रोजी मुंबई येथे जन्मलेल्या वागळे यांचे शालेय शिक्षण देशातील वेगवेगळ्या केंद्रीय विद्यालयांत झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते मुंबईच्या सेंट झेवियर्समध्ये दाखल झाले. १९८१ मध्ये त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेश मिळविला. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर विभागात दाखल झाले. हवाई युद्धतंत्राचे विशेष शिक्षण त्यांनी राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयात घेतले. तब्बल सहा हजार तास हवाई उड्डाणाचा अनुभव हे त्यांचे प्रमुख वैशिष्टय़े. सियाचीनमधील ‘मेघदूत’ आणि श्रीलंकेतील ‘पवन’ या मोहिमांमध्ये त्यांनी लक्षवेधी कामगिरी केली. शत्रूवर हल्ला चढविण्याची क्षमता राखणाऱ्या हेलिकॉप्टर तुकडीचे प्रमुखपदही त्यांनी भूषविले. काँगोतील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मोहिमेंतर्गत हेलिकॉप्टर युनिटच्या प्रमुखपदाची जबाबदारी वागळे यांनी नेटाने सांभाळली. या वेळी दुर्मीळ संधी त्यांना मिळाली. पाकिस्तानी लष्कराच्या ब्रिगेडचे त्यांनी संचालन केले. या मोहिमेतील त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामगिरीची ‘सवरेत्कृष्ट भारतीय हवाई दलाची हेलिकॉप्टर तुकडी’ या पुरस्काराने दखल घेण्यात आली. हवाई दलाच्या मुख्यालयात वागळे यांनी कार्यवाहीसाठी तुकडय़ांची सज्जता तपासणीचे आणि संचालन (हेलिकॉप्टर) विभागाचे मुख्य संचालक म्हणूनही काम केले. इतकेच नव्हे तर, ‘डिफेन्स सव्‍‌र्हिस स्टाफ कॉलेज’मध्ये हवाई प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख आणि वरिष्ठ प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. लष्करी शिक्षणादरम्यान विविध पदकांनी सन्मानित झालेल्या वागळे यांच्या हवाई दलातील कार्याची दखल त्यांना हवाई दल पदक बहाल करून घेण्यात आली आहे.